Lok Sabha Election 2019 : ‘साथी हाथ बढाना’; प्रचारासाठी मित्र पक्ष मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 02:32 PM2019-04-07T14:32:45+5:302019-04-07T14:32:58+5:30
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरली आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस संयुक्तपणे जाहीरनामा बनवित आहे. लोकसभा मतदार संघांतर्गत येत असलेल्या सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये कॉर्नर सभा मतदारांशी थेट संवाद साधल्या जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेसची ताकद अधिक असल्याने त्याचा राष्ट्रवादीला फायदा होत आहे.
जिल्ह्यात मतदार संघनिहाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून आघाडीचे प्रचार कार्यालय अनेक ठिकाणी उभारले आहे. परंतू या प्रचार कार्यालयांमध्ये काँग्रेस व इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते बोटावर मोजण्या इतकेच दिसून येत आहेत. मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचाराच्या रॅलीमध्ये दिसून येतात, मात्र त्यातील स्वयंस्फुर्तीने किती सहभागी होताहेत हे सांगणे अवघड आहे. काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद मधील सत्ताकरणांवरून अद्यापही खुमखुमी कायम आहे. प्रचार कार्यालयातून सध्या कार्यकर्त्यांना डोज देण्याचे काम जोमात सुरू आहे. कार्यकर्त्यांना बुथ निहाय जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रत्येक कार्यालयात दिवसातून एक बैठक घेण्यात येत आहे. उमेदवार येताच कार्यकर्त्यांची धावपळ प्रचार कार्यालयात दिसून येते. त्यानंतर प्रत्येक जण आपल्या बुथ परिसरातील कामांचा आढावा उमेदवारांसमोर मांडण्याची धडपड करतो. तर पुढील दिवसातील बैठकांचे नियोजनही मांडले जात आहे. या सर्व कामामध्ये मित्र पक्षातील काही मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गैरहजेरी मात्र शंका उपस्थित करते.
राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस एक पाऊल पुढे
सर्व मित्र पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. काही ठिकाणी तर प्रचार कार्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रस पेक्षा काँग्रेसच एक पाऊल पुढे आहे. मनसेने सुद्धा आघाडीला साथ दिली आहे.
- डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस
आघाडीचा धर्म पाळत जबाबदारी पूर्ण
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी झालेली आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळत प्रचारामध्ये आमची जबाबदारी पूर्ण करत आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी एकजुटीने कामाला लागले आहेत. ज्याठिकाणी आमचे नेतेच देश पिंजून काढतात; तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचेही तेच कर्तृव्य आहे.
- आमदार हर्षवर्धन सपकाळ, मित्रपक्ष काँग्रेस.