- नीलेश जोशी
बुलडाणा: १७ व्या लोकसभेसाठी बुलडाणा लोकसभा मतदार संघात १८ एप्रिलरोजी मतदान होत असून लढतीचे अद्याप चित्र स्पष्ट नसले तरी प्रसंगी दुरंगी किंवा तिरंगी ही लढत होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करती आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अतितटीच्या लढतीची शक्यता पाहता एक एक मत तुल्यबळ राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानुषंगाने माहिती घेतली असता जिल्ह्यात ३,७०७ जवानांची मते आहेत. त्यामुळे या मतांनाही आता महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, गेल्यावेळी शासकीय कर्मचार्यांचे ईडीसी आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान झाले होते. मात्र यंदा त्यात बदल झाला असून इलेक्ट्रानिकली ट्रान्सर्फर पोस्टल बॅलेट पेपरच्या (ईटीपीबीएस) माध्यमातून जवान यावेळी मतदान करणार आहेत. त्यामुळे १७ लोकसभा निवडणुकीचे हे एक वैशिष्ट्य ठरणार आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळही महायुतीविरोधात आघाडी अशी सरळ लढत जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे. त्यापृष्ठभूमीवर जवानांची मते प्रसंगी निर्णायकही ठरू शकतात. मलकापूर विधानसभा रावेर लोकसभा मतदार संघात येते. या विधानसभेतंर्गत ३३५ जवानांची मते आहेत. दरम्यान, बुलडाणा लोकसभा मतदार संघात जवान व त्यांचे कुटुंबिय मिळून तीन हजार ७०७ मतदार आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या ही तीन हजार ६६६ आहे. तर महिलांची संख्या ४१ आहे. लोकसभा निवडणूक रिंगणातील उमेदवार निश्चिती झाल्यानंतर अर्थात २७ मार्चनतंर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवार स्पष्ट होतील.त्यानंतर इटीबीपीद्वारे संबंधीत जवानांच्या इमेलवर किंवा त्यांच्या कमांड आॅफीसच्या ठिकाणी बॅलेट पेपर पाठविण्यात येतील. त्यासोबत डिक्लरेशन, बॅलेट पेपर राहील. त्याची प्रिंटआऊट काढून ती नंतर जवानांपर्यंत पोहोचविण्यात येईल.त्यानंतर त्यांचे मतदान होऊन दोन लिफाप्यांद्वारे ते पाठविण्यात येतील.
गतवेळी सैनिकांसाठी होता पिवळा लिफाफा
दरवेळेप्रमाणे यंदाही ही बॅलेट पेपरची पद्धत कायम असली तरी त्यात जवानांसाठी इटीबीपी पद्धतीने बॅलेट पेपर पाठविण्यात येईल. त्यातील डिक्लरेशनवर जवानाची सही होऊन त्याने मतदान केल्यानंतर ते पांढर्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये ते परत पाठविण्यात येईल. डिक्लरेशनवर जवानाची सही असल्यासच बॅलेट पेपरचे पाकीट उघडण्यात येईल. अन्यथा ते उघडले जाणार नाही. यावेळी हा बदल झाला आहे. गेल्यावेळी सैनिकांसाठी पिवळा लिफाफा होता. यावेळी मात्र ईटीबीपीची पद्धत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया वेगाने होऊन वेळेत हे बॅलेट पेपर संबंधीत लोकसभा मतदार संघात पोहोचतील.
तीन तालुक्यात जवानांची संख्या अधिक
बुलडाणा जिल्ह्यात जवानांच्या कुटुंबाची मते ही चार हजार ४२ आहेत. त्यातील ३३५ ही मलकापूर विधानसभा मतदार संघात येतात. हा मतदार संघ रावेरमध्ये समाविष्ठ झालेला आहे. त्यामुळे बुलडाणा लोकसभा मतदार संघात प्रत्यक्ष ७०७ मते आहेत.
एक अनिवासी भारतीय
बुलडाणा लोकसभा मतदार संघात एका अनिवासी भारतीयाचेही मतदान आहे. खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये या मतदाराचे मतदान समाविष्ठ आहे. त्यामुळे हा अनिवासी भारतीय प्रत्यक्ष मतदानासाठी जिल्ह्यात येतो कि नाही किंवा अन्य पद्धतीद्वारे त्याचे मतदान घेतल्या जाणार आहे की नाही, ही बाब अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.