बुलडाणा: १८ एप्रिल रोजी मतदान होणार्या बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील तीन उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत आहे. या मध्ये विद्यमान खासदारांची संपत्ती ही ११ कोटी ६२ लाखांच्या घरात असून त्या खालोखाल आघाडीचे उमेदवार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची संपत्ती ही नऊ कोटी ४० लाखांच्या घरात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभेचे आ. बळीराम सिरस्कार यांची संपत्ती ही तीन कोटी ६१ लाखांच्या घरात असल्याचे स्पष्ट होत आहे.बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २६ मार्च हा शेवटचा दिवस होता. त्यानुषंगाने उमेदवारी दाखल केलेल्या तथा तुल्यबळ लढतीची अपेक्षा असलेल्या उमेदवारांच्या संपत्तीचा लेखाजोखा त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञानापत्रामध्ये नमूद आहे. त्याची माहिती घेतली असता ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बीएएमएसचे शिक्षण घेतले असून विद्यमान खा.प्रतापराव जाधव यांनी चिखली येथून शिवाजी महाविद्यालतून बीए भाग एक पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. दरम्यान लोकसभा निवडुकीत हे कोट्याधीश उमेदवार आपले भाग्य आजमावत असून १८ एप्रिल रोजी दुसर्या टप्प्यात लोकसभेसाठी होणार्या निवडणुकीत या उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे.