खामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघात नवरदेवांनी २६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान केलं. लग्नाच्या आधी नवरदेवांनी मतदान करण्याला प्राधान्य दिले.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तसेच २६ एप्रिल रोजी जिल्हाभरात अनेक विवाह सोहळेदेखील आहेत. प्रत्येक शहरात मतदानासोबतच विवाह सोहळे पार पडत आहेत. अनेकांचे विवाह मतदानाची तारीख जाहीर होण्यापूर्वी ठरले होते. काही नागरिकांनी लग्नाची तारीख बदलली तर काहींनी कायम ठेवली.
वऱ्हाडी व नवरदेव यांनी लग्नाच्या पूर्वी मतदान करण्याला प्राधान्य दिले. खामगाव विधानसभा मतदारसंघातील रोहणा येथील रमेश नागोराव देशमुख यांनी मतदान हक्क बजावला. तसेच मतदान केंद्र ७४ निपाणा येथे नवरदेव योगेश हिरळकार यांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगणा कारेगाव येथे सुद्धा नवरदेवाने मतदान केले. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे लग्न पूर्वी नवरदेवाने मतदान केले. लग्नाला जाण्यापूर्वी अनेक वर्हाडींनी मतदानाचा हक्क बजावला.