- नारायण सावतकारवरवट बकाल : मारोड गावातील विलीगिकरण कक्षाच्या शौचालयाची १० वर्षाच्या चिमुकल्या मुलाला स्वच्छता करायला लावली. हे प्रकरण संबंधितांना चांगलेच भोवले असून, बुधवारी मारोड येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षकाला निलंबित करण्यात आले.
संग्रामपूर तालुक्यातील मारोड गावात विलीगिकरण कक्ष उभारून गावातील कोरोना रुग्ण या ठिकाणी दाखल करण्यात येत आहे. याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रामामूर्ती यांचा दौरा असल्याने पंचायत समितीच्या अंतर्गत प्रशासनाने एका लहान मुलाकडून शौचालय साफ करून घेतले. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच संग्रामपूर पंचायत समिती प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला. तसेच भाऊ भोजने यांनी गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्यासह इतर दोषींवर कारवाई करण्यासाठी रविवारी तामगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. ३१ मे रोजी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संबंधित मुलाला आर्थिक मदत देऊन गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी व इतर दोषींवर कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केलीे. या प्रकरणात ३१ मेच्या सायंकाळी ग्रामसेवक विकास शिवदे यांना निलंबित करण्यात आले. बुधवारी प्राथमिक शाळेत कार्यरत मुख्याध्यापक महेंद्र रोठे व सहाय्याक अध्यापक कुंदन नारोटे यांना जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी निलंबित केले. या आदेशाच्या संदर्भात लोकमत वृत्ताचा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्याध्यापकसह शिक्षक निलंबित काळात लोणार तालुक्यात राहणार आहे. आतापर्यंत गटविकास अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.
निलंबन आदेशात 'लोकमत' वृत्ताचा उल्लेख
जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी मुख्याध्यापक व शिक्षकाचे निलंबन केले आहे. भाग्यश्री विसपुते यांनी काढलेला १९६४ भाग २ नियम ३ अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २०० नुसार निलंबित आदेश दिला. या आदेशामध्ये लोकमत वृत्ताचा उल्लेख करून निलंबित करण्यात आले आहे.