लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ग्राम पंचायतच्या खात्यातून पैसे काढल्यानंतर देखील आर.ओ.प्लांट लावले नसल्याचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ‘लोकमत’वृत्ताची दखल घेत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विस्तार अधिकाºयांना निलंबित केले. त्यानंतर आता तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीत आर.ओ. प्लांटच्या कामास सुरूवात करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीत आर.ओ. प्लांट बसविण्याची तरतूद करण्यात आली. या तरतुदीनुसार आर.ओ. प्लांट बसविण्यासाठी ग्राम पंचायतच्या खात्यातून २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा निधी देखील वळता करण्यात आला. मात्र, निधी वळता होवून सुमारे १ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील अनेक ग्रामपंचायतीत आर. ओ. प्लांट बसविण्यात आले नाही. याप्रकरणी गणेशपूर-कुंबेफळ जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य रेखा चंद्रशेखर महाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे यांनी खामगाव तालुक्यातील माटरगाव, गेरू, बोरजवळा, भंडारी, झोडगा, पिंप्री कोरडे, निरोड, लोणी गुरव, पिंप्री धनकर, टाकळी, हिवरा खुर्द, अंत्रज आदी ठिकाणी भेटी देत, चौकशी अहवाल देखील तयार केला. तसेच ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता उपरोक्त ठिकाणी आर.ओ. प्लांट बसविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
बोरजवळा येथे टिनशेडची उभारणी!
खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे आर.ओ.प्लांट उभारणीसाठी टिनशेड उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खामगाव तालुक्यातील इतर गावातही आर.ओ. प्लांटच्या कामाने गती घेतली आहे.