लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: दीपावलीच्या सुटीचा फायदा घेत अनेक पर्यटकांनी लोणार सरोवर येथे गर्दी करीत आहेत. सरोवराबरोबरच येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लोणार येथे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.लोणार सरोवर हे जागतिक कीर्तीचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी त्रिवेणी संगम पाहावयास मिळते. तो म्हणजे उल्का पडल्यामुळे लोणार हे सरोवर तयार झाले, त्यामुळे यास वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्या जात आहे. तर लोणार नगराचा पहिला संदर्भ ऋग्वेदमध्ये आला असल्यामुळे या ठिकाणी विष्णूचे मुख्य १0 अवतार असल्यामुळे या शहराला पौराणिक असेसुद्धा संबोधल्या जाते. तर ऐतिहासिक म्हणून सम्राट अशोकाच्या साम्राज्यात लोणार असल्याचे अनेक ठिकाणी नोंद असल्यामुळे लोणार सरोवरास त्रिवेणी संगम म्हणून ओळखल्या जाते. अशा त्रिवेणी संगमापैकी एक संगम म्हणजे पौराणिक कथेनुसार पुराणमध्ये लोणार सरोवरामध्ये कमळजा देवीचे मंदिर आहे पौराणिक कथेनुसार अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्राने राम वनवासात आले असता सीतेची ओटी देवीने भरली होती. तसेच तपश्चर्या केली होती. ही भक्ताना पावन होणारी देवी आहे. येथे मोठय़ा संतांनी व ऋषींनी तपश्चर्या केली. मराठवाडा, खान्देश, विदर्भामधील बर्याच कुळाची ही कुलदेवता आहे. मंदिरासमारे एक विहीर आहे. तिला योनी कुंड (सौभाग्य तीर्थ) असेसुद्धा संबोधल्या जाते. त्या कुंडास ‘सासू-सुने’ची विहीरसुद्धा म्हटल्या जाते. यामध्ये सासू-सुनेची विहीर म्हणजेच एकाच विहिरीतील पाण्याची चव ही वेगवेगळी असून, देवीकडील बाजूची चव ही गोड असल्यामुळे तिला सुनेची विहीर तर सरोवराकडील विहिरीतील पाणी खारट असल्यामुळे तिला सासूची विहीर, असेसुद्धा बोलल्या जाते. अशी आगळी-वेगळी विहीर गेल्या १९ वर्षांपासून पाण्यामध्ये बुडाली होती; मात्र गत ४ वर्षांपासून झपाट्याने खालावत चाललेल्या लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत यावर्षी अजूनच घट झाली. वाढत्या तापमानामुळे व अपुर्या पावसामुळे पाण्याची पातळी किमान १0 फूट कमी झाली. ही विहीर सन १९९८ मध्ये सहजगत्या दृष्टीस पडली होती; मात्र सरोवराच्या पाण्याची पातळी अचानकपणे वाढल्यामुळे ही विहीर परत पाण्यात लुप्त झाली; मात्र गेल्या ४ वर्षांपासून आटत चाललेल्या पाण्याच्या पातळीमुळे ही ‘सासू-सुनेची विहीर’ मे २0१७ मध्ये दिसून आली. महिनाभरात पडलेल्या पावसामुळे विहिरीचे दर्शन जरी होत नसले तरी मात्र हिरवाईने नटलेला सरोवर परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे. सकाळी व सायंकाळी सरोवरामध्ये पडत असलेले धुके मन वेधून घेत असून, मोर, लांडोर पक्षी पर्यटकांना पाहावयास मिळत आहे.
जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला वैज्ञानिक, ऐतिहासिक व पौराणिक वारसा आहे. त्यांची पाहिजे तशी प्रसिद्धी शासन वा संबंधित विभागाकडून होत नसून, स्थानिक पातळीवर पर्यटकांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे .- श्रीकांत साखरे, पर्यटक, नाशिक.