किशोर मापारी लोणार, दि. ९- जागतिक दर्जाच्या लोणार सरोवरामध्ये निरी प्रकल्पातील दुषित पाणी जात आहे. या दुषित पाण्यामुळे ऐतिहासिक लोणार सरोवराला धोका निर्माण झाला असून संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जगातील आश्चर्य समजल्या जाणार्या व संशोधकांचा नेहमीच संशोधनाचा विषय ठरलेल्या लोणार सरोवरावराचे जतन होण्यासाठी विविध पातळ्य़ांवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील सांडपाणी सरोवरापर्यत पोहचू नये यासाठी १५ वर्षापूर्वी ३६ लक्ष रुपये खर्च करुन नबीच्या खड्डयाजवळ दगडी भिंत बांधण्यात आली. मात्र ही भिंत बांधल्यानंतरही अस्वच्छ पाणी सरोवरात जात असल्याचे चित्र आहे. यामुळे सरोवराच्या खार्या पाण्यात असलेली अतिशय दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे. यामुळे जगभरातील संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील काही विज्ञानप्रेमिंनी निसर्गाचा हा अद्भूत ठेवा जतन आणि संवर्धनाची याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी विकास आराखडा तयार केला. त्यानुसार सरोवरात जाणारे शहरातील दुषित पाणी रोखण्यासाठी २0११ मध्ये १ कोटी २५ लक्ष रुपये निधी मंजूर केला. यासाठी शासनाने निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी संशोधन संस्था नागपूर) यांच्याकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार करुन प्रकल्पाचे काम सुरु केल्यापासून वर्षभरात पूर्ण करायचे होते. मात्र अनेक वर्ष होऊनही काम अपूर्ण आहे. जी भिंत उभारण्यात आली ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोपी विज्ञानप्रेमींकडून होत आहे. - शहरातील सांडपाणी थांबविण्यासाठी सरोवर काठावर उभारलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या निकृष्ट कामामुळे ऐतिहासिक लोणार सरोवराची दुरवस्था झाली आहे. जोपर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम चांगले होत नाही, तोपर्यंत सदर प्रकल्प हस्तांतरण करुन घेणार नाही.- भूषण मापारी ,नगराध्यक्ष ,लोणार .- सदर प्रकल्पाची देखरेख योग्यरीतीने झाल्यास प्रकल्प कार्यान्वित होऊन शहरातील सांडपाणी सरोवरात जाणार नाही. यामुळे सरोवराचा परिसर दुषित होण्यापासून वाचेल.-प्रा.गजानन खरात, सरोवर जतन व संवर्धन समिती, लोणार .
लोणार सरोवराला दूषित पाण्याचा धोका!
By admin | Published: March 10, 2017 1:53 AM