किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यातील अंभोरा व हिरडव येथील धरणांमधील जलसाठा शून्यावर पोहचला आहे, तर इतर धरणांतील जलसाठाही खालावला आहे. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याने पाणी पुरवठय़ासाठी टँकरची मागणी वाढत आहे. गेल्या पाच वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण कमी होत चालल्याने तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी अल्प स्वरूपाचा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्नावरही झाला. तालुक्याला भीषण पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी विहिरी अधिग्रहण व टँकरची सुविधा करून पाणीपुरवठा मागील वर्षांपासून उन्हाळ्यात होत आहे; मात्र जलस्वराज, महाजल सारख्या ग्रामीण पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीच राबविल्याने पाणीटंचाईची परिस्थिती दरवर्षी दिसून येते. ठोस उपाययोजना न राबविल्यामुळे आणि जलसंधारण ची कामे थातूरमातूर होत असल्याने तालुक्यातील जनतेला यावर्षीही भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावातील नागरिक खासगी टँकरने पाणी विकत घेत असून, त्यासाठी किमान ५00 रुपये मोजत आहेत; मात्र ज्यांची पाणी विकत पाणी घेण्याची कुवत नाही त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात भटकंती करावी लागत आहे.
लाखो रुपये खर्च करूनही पाणीटंचाई कायम!उन्हाळा आला की तालुक्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. सदर पाणीटंचाई निवारण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी विविध योजनेद्वारे लाखो रुपये खर्च करण्यात येतो; मात्र अर्धवट कामे व अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करूनही संबंधित गावात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत आहे.
विहीर अधिग्रहण केलेली गावे!लोणार तालुक्यात वझर आघाव, हिवराखंड, चिंचोली सांगळे, शारा, येसापूर, रायगाव, तांबोळा, दाभा, देवानगर, वडगाव तेजन, ब्राह्मण चिकना, पहूर, वाल्हूर, वेणी, शिंदी, वसंत नगर, सोमठाना, उदनापूर, कोयाळी या गावांमध्ये प्रत्येकी एक तसेच सावरगाव तेली चार, भुमराळा चार, अंजनी खुर्द दोन, किनगाव जट्ट दोन, भानापूर दोन विहिरी अधिग्रहण केल्या आहेत.