किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: अप्पर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे; मात्र लोणार शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अभियानांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला तरी अंमलबजावणी मात्र कुठेच दिसून येत नाही.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी वाहतूक शाखेकडून वाहनांवर कारवाई होत असतानाही वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. सुरक्षा सप्ताह सुरू असताना तरी वाहतुकीला शिस्त लागेल, अशी अपेक्षा असताना तसे होताना दिसून येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहने बेदरकारपणे चालवणे, कर्कश हॉर्न वाजविणे, धावत्या दुचाकीवर मोबाइलवर बोलणार्याची संख्या कमी नाही. तसेच शालेय विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांमध्ये कोंबाकोंबी सुरूच आहे. अवैध प्रवासी वाहतूक, परवाना न हाताळणे, इंग्रजी, मराठी फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा वापरणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे आदी नियम तोडणार्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले असले तरी मात्र वाहतूक पोलिसांनी कारवाई करूनदेखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात वाहने पार्किंगसाठी व्यवस्था नसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला नियमबाह्य उभी राहत असून, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते; परंतु वाहनचालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. हेल्मेटविषयी मोटार सायकलस्वारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उदासीनता असल्याचे निदर्शनास आले.
अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी!लोणार शहरातील प्रत्येक चौकात व मेहकर-लोणार मार्गावर चालणार्या प्रवासी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या काळातच वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र अल्पवयीन मुलेही दुचाकी चालविताना आढळून येत आहेत. एका दुचाकीवर तीन ते चार जण व विना परवाना सुसाट सुटत अनेक अल्पवयीन मुले, मुली दुचाकी वाहने चालवि ताना सकाळ-संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. ग्रामीण भागात जाणार्या ऑटोसह काळी पिवळी वाहनांमध्येही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेले जात असल्यामुळे काही ठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत.
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, दंड वसूल करण्यात आला आहे. सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.- डी.एम. राठोड, वाहतूक शाखा, लोणार.