लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवलेला असून, नवीन रस्त्यासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. लोणार ते मंठा सुरू असलेल्या मार्गावर आठवड्याभरात २२ जानेवारी रोजी तिसरा अपघात घडला असून, यामध्ये एका २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.सचिन अशोक सोनवणे (वय २४ वर्ष), ओमकार महादेव खुळे (वय २४ वर्ष), अतुल सदावर्ते (वय २२ वर्ष) सर्व राहणार तळणी, ता. मंठा जि. जालना हे दुचाकीने अंदाजे ४ वाजून ३0 मिनिटांनी लोणारहून तळणीकडे जात असताना रस्त्यावरील खड्डय़ात दुचाकी जाऊ नये या प्रयत्नात उभ्या असलेल्या टाटा एस क्र. एम.एच. १६.एवाय.२२५८ या चारचाकी वाहनांवर धडकले.अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. लोणार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना मेहकर येथे हलविण्यात आले. मेहकर येथे उपचारादरम्यान सचिन अशोक सोनवणे (वय २४ वर्ष) या युवकाचा मृत्यू झाला असून, वृत्त लिहेपर्यंत लोणार पोलीस स्टेशनला अपघातासंदर्भात नोंद झालेली नाही; मात्र अपघातग्रस्त दुचाकी व चारचाकी वाहन पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे.
ऑटो-दुचाकी अपघातात एक ठारदेऊळगावराजा: मालवाहू ऑटो व दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री सिंदखेडराजा मार्गावरील जांभोरा फाट्यानजीक घडली. जांभोरा फाट्यानजीक मालवाहू ऑटो व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात घडला. सदर अपघातात संजय भानुदास आढाव (वय ४५) रा. देवखेड, ता. सिंदखेडराजा हे जागीच ठार झाले. मृतकाचे चुलतभाऊ संजय नायबराव आढाव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऑटो चालका विरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव राऊत तपास करीत आहे.