बुलडाणा: विदर्भ-मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात असेलल्या गिरडा जंगलात पिकनिकसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चार अज्ञात युवकांनी मारहाण करत त्यांच्याकडील ४६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी १२ तासांच्या आतच कुठलेही धागेदोरे नसताना ५ आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणात बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी समीर जलाल बागुल (२०), आमीर शेख खाबरडे (२२), सुलतान दिलवार बरडे (२३, तिघे रा. मढ) आणि मजीद जुम्मा तडवी (२८, रा. जांभुळ, ता. जामनेर, जि. जळगाव) या चौघांना बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या चारही आरोपींकडून ४ मोबाईल खरेदी करणाऱ्या अफसर अकबर तडवी (२७, पहूर पेठ, जि. जळगाव) या पाचव्या आरोपीसही अटक केली आहे. त्यांना बुलडाणा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायने १५ जुलै रोजी या आरोपींना १७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.बुलडाणा तालुक्यातील गिरडा हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे नागरिक फिरण्यासाठी येतात. १४ जुलै रोजी बुलडाणा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयचे काही विद्यार्थी गिरडा येथे पिकनीकसाठी गेले होते. त्यावेळी चार विद्यार्थी हे फिरत फिरत पुढे निघून गेले होते. त्यावेळी चार अज्ञात युवकांनी या मुलांना मारहाण करून त्यांच्याकडून नगदी ७५० रुपये आणि चार मोबाईल असा ४६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला आहेता. घटनेनंतर या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या भूषण रमेश राठोड (२३, रा. डीपी कॉलनी, वाशिम) याने बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या आधारावर पोलिसांनी चारही अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.