खामगाव : नगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा गोळा करताना ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे आवश्यक असताना कंत्राटदाराकडून या बाबीचे पालन होत नसल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले. शहरातील घरोघरी जावून कचरा गोळा करण्याचा कंत्राट नगर परिषदेने घंटागाडी योजनेंतर्गत दिलेला आहे. यामध्ये कंत्राटात नमूद अटी-शर्तीनुसार ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे प्रावधान आहे. मात्र प्रत्यक्षात घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याची कोणतीही व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे कचरा विलगीकरण होत नसल्याने त्याची विल्हेवाटसुद्धा योग्यरीतीने लागत नाही. घरोघरी जावून कचरा गोळा करताना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याबाबत कोणतीही सूचना घंटागाडीद्वारे दिली जात नाही. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून कचरा सडण्याची प्रक्रिया लवकर सुरु होते व सर्वत्र घाण, दुर्गंधी पसरते. कचरा व्यवस्थित जाळला जात नाही. परिणामी, त्याची योग्य विल्हेवाट लागत नाही. कंत्राटदाराकडून कचरा विलगीकरणाची प्रक्रिया पार पाडली जात नसताना नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत लोकमतने सोमवारी स्टिंग आॅपरेशन केले असता, शहरातील विविध भागात जाणाऱ्या कोणत्याही घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था दिसून आली नाही. असे असते ओल्या कचऱ्याचे स्वरूपप्रत्येक घरामध्ये भाजीपाला निवडल्यानंतर त्यातील उरलेला खराब हिस्सा हा कचऱ्यात टाकला जातो. तसेच बरेच दिवस पडून राहिलेल्या भाज्या व फळे खराब झाल्यानंतर त्यापासूनही ओला कचरा उत्पन्न होतो. याशिवाय उरलेले अनेक शिळे खाद्यपदार्थ अशा कचऱ्यात दिसून येतात. हा कचरा साधारणत: प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरुन ठेवला जातो. घंटागाडीमध्ये व्यवस्था असल्यास तो सहज वेगळा करुन दिला जावू शकतो.