लाेणार : तालुक्यातील नांद्रा येथील वन विभागाने तयार केलेले दोन माती तलाव फुटल्याने चार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नांद्रा परिसरात सतत तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यामुळे वन विभागाने बनवलेले दोन माती तलाव फुटले. हे पाणी शेतात शिरल्यामुळे नांद्रा येथील सखाराम किसन कोकाटे, यमुनाबाई किसन जाधव, मथुराबाई नामदेव धोत्रे, कुंडलिक रामभाऊ घाटे या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या पाण्यामुळे शेतातील सोयाबीन, कपाशी या पिकांसह जमीन खरडून गेली आहे. त्यासोबतच तीन शेतकऱ्याच्या विहिरी खचल्या असून, त्या गाळाने भरल्या आहेत. तसेच विहिरीतील मोटार पंप, पाईप, स्प्रिंकलर आदी साहित्याचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़