यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरली. कंपनीचे पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशी तक्रार देऊळगाव राजा तालुक्यातील गोंधनखेड येथील सखाराम शामराव गीते यांनी केली आहे. यामुळे कृषी विभागाने तक्रारीची दखल घेत कृषी उपविभागीय अधिकारी वसंत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पथक निर्माण केले. या ठिकाणी कृषी विभागाचे शास्त्रज्ञ कानवडे, देऊळगाव राजा तालुक्यातील कृषी अधिकारी रोहिदास मासाळकर, प्रांजली कोरेवर, घनश्याम डोईफोडे, कृषी विभागाचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रबी हंगामात काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बीजोत्पादन क्षेत्रातील हरभरा, गहू, कांदा आदी पिकाला फटका बसला. त्यात आता बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. परिसरात बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. पेरा करूनही बाजरी बीज भरले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळते. सरकारने वेळीच लक्ष घालून बोगस बियाणांच्या कंपन्यांना लगाम घातला पाहिजे.
शेतकरी संकटात
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. बहुतांश शेतकरी आज बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागत आहे.