लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : सतत चार ते पाच वर्षांपासून विविध संकटांचा सामना करीत असलेला तालुक्यातील शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. मुळातच कष्टाळू व जिद्दी असणार्या काही शेतकर्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जास्त उत्पन्नाच्या आशेने नवीन पिके अवलंबिली आहेत. यामध्ये मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्यांनी तायवान पपईची लागवड केली खरी; परंतु बोगस व निकृष्ट दर्जाच्या पपई रोपांमुळे दोघांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.मोमीनाबाद येथील सचिन संजय काळे या तरूण शेतकर्याने शेतीला नवी दिशा देत उत्पन्नवाढीचा मार्ग म्हणून तायवान पपईची दोन हजार रोपांची लागवड केली. सचिनने मोहोळ जि. सोलापूर येथील एका रोप वाटिकेमधून २ मार्च १७ रोजी ११ रूपये प्रमाणे दोन हजार रोपे खरेदी केली व मार्च महिन्यातच दोन ते अडीच एकर क्षेत्रावर लागवड केली. यानंतर खते, फवारणी औषधे, मजुरी, ठिबक सिंचन असा एकूण दीड लाख रुपये खर्चही केला; परंतु झाडे मोठी होतानाच यामधील काही झाडांना फळधारणा होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोमीनाबाद येथीलच सुरेश लक्ष्मण गवळे यांनीसुद्धा याच रोपवाटिकेमधून मार्च महिन्यात ११ रुपये प्रमाणे चार हजार पपई रोपे रुपये ४४,000 रुपयाला खरेदी केली व लागवड केली. त्यांनीही खते, फवारणी, औषधे, निंदण, ठिबक सिंचन व इतर खर्च मिळून पपई बागेसाठी जवळपास साडेतीन लाख रूपये खर्च केला; परंतु त्यांच्याही ५0 टक्के झाडांना फळधारणा झाली नसल्याने या दोघांनीही रोपवाटिका संचालकाशी तीन महिन्यांपूर्वी संपर्क साधला. चार ते पाच वेळा फोन केल्यावर रोपवाटिकेचे प्रतिनिधी हे मोमीनाबाद येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गेले; परंतु यानंतरही काही प्रतिसाद न मिळाल्याने दोनही शेतकर्यांनी कृषी अधिकार्यांकडे तक्रार केली. यानंतर तालुका कृषी अधिकारी पी. ई. अनगाईत, पं.स. कृषी अधिकारी चव्हाण यांनी सदर शेतांवर जावून पाहणी केली असता, नुकसान झाल्याचे आढळले. पंचनामा करण्यात आला व त्यामध्ये ३८ टक्के झाडे वांझ असून, फळधारणाच झाली नसल्याचे व फळधारणा झालेल्या झाडांनाही कमी फळे लागल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. त्यामुळे या शेतकर्यांचे ५0 टक्के नुकसान झाले आहे. प्रति झाड एक क्विंटल माल निघत असताना अर्धी झाडे वांझ निघाल्याने सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकर्यांनी स्वत: रोपे तयार करावीतपपई किंवा अन्य फळझाडांची रोपे विकत घेताना त्यावर कोणतेही लेबल नसते. कायद्याचा आधार नसतो, कोणत्या बियाण्याचे रोप आहे, याची खात्रीही नसते. बियाण्यांची मुदत काय होती. जात, प्रकार अशी कोणतीही माहिती व खात्री रोप घेताना नसते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता पाहता शेतकर्यांनी स्वत: रोपे आपल्या डोळ्यांसमोर आपल्या शेतात तयार केल्यास त्याचा त्यांना फायदा होईल.
मोठय़ा हिंमतीने पपईची लागवड केली होती. आवश्यक तो सर्व खर्चही केला; परंतु झाडेच वांझ निघाल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून, खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, ही अपेक्षा आहे.- सचिन काळे,शेतकरी मोमीनाबाद
याबाबत बोडखे रोपवाटिकेचे मालकांशी फोनवर चर्चा केली असता, त्यांनी तुमच्याच्याने जे होईल ते करा, अशा शब्दात अवहेलना केली. शेतकर्यांचा गैरफायदा घेतला जातो. झालेले नुकसान खूप जास्त आहे. त्यामुळे कृषी विभागाने न्याय मिळवून द्यावा.- सुरेश गवळे,शेतकरी मोमीनाबाद.