दरवर्षी आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. यामध्ये प्रामुख्याने हापूस आंब्याचा समावेश आहे. यापाठोपाठ केशर, साधा हापूस, दशेरी व गावरान आंब्याचे भाव असतात. त्यामुळे दरवर्षी सर्वसामान्यांचा कल केवळ गावरान आंबे खरेदीकडे जास्त असतो. मात्र, यावर्षी सर्वच प्रकारच्या आंब्याचे भाव घसरले आहेत. बाजारपेठेत आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातुलनेत मागणी नसल्याने अतिशय कमी दरात व्यापाऱ्यांकडून आंब्याची विक्री करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील मर्यादीत वेळेतच विक्रीसाठी परवानगी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात खप होत नाही. भाव खाली आल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावरान आंब्याचेही दर गडगडल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात आमराईचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तरीदेखील सिंचनाची उत्तम व्यवस्था असलेले व इतर फळबागांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे.
आवक वाढली, ग्राहक रोडावले
आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, कोरोनामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. मात्र, भाव कमी असल्याने काही ग्राहक केशर, साधा हापूस, दशेरी, गावरान आंबा खरेदी करताना दिसून येतात. कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. एकीकडे भाव कमी असूनदेखील ग्राहक नसल्याने आंब्याची गुणवत्ता खराब होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. विक्रीसाठी खरेदी केलेल्या आंब्याची विक्री पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने व्यापारी अडचणीत आले आहेत.
सध्या आंब्याचा सिझन आहे. यामुळे इतर फळांपेक्षा आम्ही आंबा विक्रीला प्राधान्य देतो. मात्र, यावर्षी मागणी कमी असल्याने आंबा अतिशय कमी दरात विकल्या जात आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
-प्रभाकर वानखडे, फळ विक्रेता.
सुरुवातीला सर्व प्रकारचे आंबे विक्रीसाठी आणले; परंतु भाव अतिशय कमी मिळत असल्याने कोणत्याही प्रकारचा नफा मिळत नाही. यामुळे आंब्यापेक्षा इतर फळांच्या विक्रीला पसंती देत आहोत.
शेख अकील, व्यापारी.
आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत
सिंचनाची सोय असल्याने पेरूबरोबरच आंब्याच्या झाडांची देखील लागवड केली. यामध्ये दोन ते तीन प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीपासूनच आंबे यायला सुरुवात झाली. मात्र, कोरोनामुळे भाव कमी असल्याने नुकसान होत आहे.
-किशोर तायडे, शेतकरी.
इतर परंपरागत पिकांपेक्षा फळझाडांची लागवड करण्यावर भर दिला. यामध्ये पेरू, सीताफळ, संत्री व आंब्याचा समावेश आहे. आंबे यायला यावर्षीच सुरुवात झाली आहे. मात्र, मागणी नसल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
-संदीप वावगे, शेतकरी.