लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.बुलडाणा शहरासह परिसरातील गावाला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. धरणाची क्षमता १२.४० दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. ऐन दुष्काळातही बुलडाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागलेल्या नाहीत. मात्र सध्या धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. उपलब्ध साठ्यातून महिनाभर नागरिकांना पाणी पुरे शकते. मात्र त्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. बुलडाणेकरांना दरडोई १०० लीटर याप्रमाणे दररोज ७० लाख लीटर पाणी लागते. परिसरातील गावांनाही येळगाव धरणातूनच पाणीपुरवठा होतो. येळगाव धरणातून प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल होते. सध्या उपलब्ध जलसाठा ३० जूनपर्यंत पुरेल, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.दुष्काळामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटला आहे. अनेक प्रकल्प कोरडे पडले असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पातील जलसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सिंचनासाठी प्रकल्पाच्या पाण्याचा वापर करु नये असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. तरीही काही ठिकाणी मोटारपंपाद्वारे पाणी उपसा सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. भीषण पाणीटंचाई असतांनाही अवैध पाणी उपसा करणे गंभीर बाब असून संबंधितांवर कडक कारवाईचे संकेत आहेत. सध्या उपलब्ध असलेला जलसाठा हा मृतसाठा आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही. परंतू मान्सून लांबला तर बुलडाणेकरांच्या चिंता वाढणार आहेत.(प्रतिनिधी)
येळगाव धरणात महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 3:14 PM