लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सोन्याच्या गिन्न्या असल्याचे भासवून अंत्रज येथील दोघांनी एका आॅटो चालकास दीड लाखाने गंडविले. २७ आॅगस्ट रोजी ही घटना खामगाव तालुक्यातील अंत्रज शिवारात घडली.अमर जगदीश सरबेरे (४०, रा. विलासनगर अमरावती) यांच्या मोबाईलवर अंत्रज येथील विजय चव्हाण याने संपर्क साधला ‘खोदकामात जुनी सोन्याच्या गिन्न्या सापडली आहेत, ती तुम्हाला दीड लाख रुपये पाव किलो प्रमाणे दिल्या जातील’ असे आमिष दाखविले.या गोष्टीवर विश्वास ठेऊन सरबेरे २७ आॅगस्ट रोजी अंत्रज येथे आले. त्यावेळी विजय चव्हाण आणि एका अनोळखी इसमाची त्यांनी भेट घेतली. सोन्याच्या नाण्यांचा दीड लाखात सौदा केला. त्यानंतर विजय चव्हाण याने सरबेरे यांना गावातील मंदिराकडे नेऊन नकली नाणी देत, त्यांच्याजवळील दीड लाख आणि मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला. याप्रकरणी अमर सरबेरे यांच्या तक्रारीवरून विजय चव्हाण आणि आणखी एका विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणारी टोळी गेल्या काही वर्षापासून सक्रीय आहे. गेल्या महिन्यात औरंगाबाद तालुक्यातील कन्नड तालुक्यातही बुलडाणा जिल्ह्यातील एका टोळीने असे एका कुटुंबाला लुटले होते. औरंगाबाद परिसरातील हर्सलसह लगतच्या भागातही गेल्या काही वर्षात बुलडाण्यातील टोळीने अशी फसवणूक केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडण्यात आले आहे. त्यात आता खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील घटनेची भर पडली.
सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमीष; दीड लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 12:26 PM