सदानंद सिरसाट, जळगाव जामोद (बुलढाणा) : इंदूरवरून अकोलाकडे येणारी प्रवासी लक्झरी बस जळगाव जामोद-बऱ्हाणपूर रोडवरील निमखेडीपासून १५ ते २० किमी अंतरावरील मध्य प्रदेशातील जास्वंदी करोली घाटात शनिवारी पहाटे ५ वाजता उलटली. त्यानंतर चाळीस फूट दरीत घसरत गेली. यामध्ये वीस प्रवासी जखमी झाले. जीवित हानी झाली नसल्याची माहिती बऱ्हाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली.
जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर हा मध्य प्रदेशकडे जाणारा जवळचा मार्ग असल्याने गत काही महिन्यापासून या मार्गाने लक्झरी बसेस ये -जा करतात. हा मार्ग अधिकृत होणे बाकी असला तरी या मार्गाने लक्झरी बसेससह अनेक खासगी वाहने ये-जा करतात. शनिवारी पहाटे ५ वाजता या मार्गाने इंदूरवरून अकोल्याकडे लक्झरी बस येत होती. निमखेडीपासून पुढे मध्य प्रदेशात असलेल्या जास्वंदी करोली घाटात गाडीची बॅटरी खराब झाली. ती दुरुस्त करण्यासाठी चालकाने थांबवली. त्यावेळी मागील चाकाला लावलेला दगड लहान असल्याने ती उतारावरून मागे सरकली व सरळ चाळीस फूट दरीत जाऊन पडली. त्यामध्ये २० प्रवासी जखमी झाले.
घटनेची नोंद मध्य प्रदेशातील शहापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. तसेच शहापूर व बऱ्हाणपूर येथून तातडीने आरोग्य पथक व पोलिस कुमक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित बऱ्हाणपूर येथे रवाना करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने औषध उपचार करण्यात आले. बसमध्ये अकोला, नांदुरा, खामगाव, जळगाव जामोद, बाळापूर, शेगाव येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे. तर, काही प्रवासी हे मध्य प्रदेशातील असून, ते अकोला येथे येत होते.