अल्पावधीत प्रसिद्धीला आलेल्या या धार्मिक स्थळांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, या ठिकाणी लोकवर्गणीसह पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र भक्त निवास हे गडावरील वैशिष्ठ्य आहे. विविध जातींची हजारो झाडांचे रोपण याठिकाणी झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रती पंढरपूर भासावे, अशी येथील रचना असून, राजस्थानी दगडात अत्यंत कोरीव नक्षीकाम भाविकांचे आकर्षण ठरत आहे. हरिभक्त परायन सानप गुरुजी यांच्या संकल्पनेतून हे सुबक मंदिर साकारले आहे. जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून येथील मंदिर परिसर विकसित करण्यात आला आहे. संस्थानच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह येथे गो पालन, जनहिताचे विविध उपक्रम राबविले जातात.
विदर्भ, मराठवाड्यातील हजारो भाविकांना प्रत्येकवेळी पंढरपूर येथे जाणे शक्य नसते. त्यांना याच भागात पंढरपूर वाटावे, असे मंदिर वैष्णव गडावर साकारले असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शासनाच्या ब वर्ग दर्जा प्राप्त असलेल्या या विठ्ठल रूखमाई मंदिरात या वर्षीच्या आषाढी एकादशीपासून पालकमंत्री यांनी सपत्नीक महापूजा करावी; परंतु यासाठी शासन निर्णय त्वरित निर्गमित व्हावा, अशी मागणी असल्याचे काजी यांनी सांगितले.
जिजाऊ जयंतीला जिजाऊंची महापूजा मुख्यमंत्र्यांनी करावी
राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती १२ जानेवारी रोजी साजरी होते. या दिवशी महाराष्ट्रभरातील लाखो जिजाऊ भक्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येतात. ज्या प्रमाणे मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला जावून विठ्ठलाची महापूजा करतात, त्याच धर्तीवर जिजाऊ नगरी सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंची महापूजा व्हावी, ही जिजाऊ भक्तांनी मागणी आपण मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही ॲड. नाझेर काजी यांनी सांगितले.