बुलढाणा : शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजपला आगामी निवडणुकांमध्ये राेखण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले आहेत. आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पदवीधर मतदारसंघ, बाजार समितीच्या व सहकारातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी ६ सप्टेंबर राेजी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखाेरी केल्यानंतर शिवसेनेत दाेन गट पडले आहेत. त्यातच खासदारांसह आमदार शिंदे गटात गेल्याने भाजप आणि शिंदे गटाचे प्राबल्य वाढत आहे. हे प्राबल्य राेखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे, शिवसेना शिंदे गट-भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र येत्या निवडणुकांमध्ये पहायला मिळणार आहे.
बुलढाणा येथील विश्रामगृहावर मंगळवारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे होते. या बैठकीला आमदार राजेश एकडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने आदींसह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.