बुलडाणा जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यात २७ ग्रामपंचायतींमध्ये ९५ सदस्यांची अविरोध निवड झाली आहे. याशिवाय काही ठिकाणी तर एक-दोन जागांसाठीच निवडणूक होत आहे. पक्षांचे कार्यकर्ते स्वतंत्र लढण्याला पसंती देत असून, काही ठिकाणी एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गटही दिसून येत आहेत. सध्या गावातील आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा खटाटोप लक्षात घेता कार्यकर्त्यांमध्ये झुंज रंगली आहे. अनेक पुढाऱ्यांनी गाव पातळीवर सलोख्यासाठी एकत्रित येऊन अविरोध निवडणुकीचे आवाहन केले होते. मात्र, कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतूनच पुढच्या जि.प. व पं.स.चा प्रवास सुकर करण्याची संधी असते. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणे अथवा आपल्या गटाचे पॅनल उभे करतात. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या, तरीही पक्षीय कार्यकर्तेच पॅनलच्या माध्यमातून आपापले वर्चस्व सिद्ध करतात. कुठे काँग्रेस तर कुठे शिवसेना वरचढ आहे. कुठे राष्ट्रवादी तर कुठे भाजप वरचढ आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारावी, यासाठी नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. अगदी मोजक्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे सूत जुळले आहे. त्यानुसार कार्यकर्ते एकत्र येऊन काम करताना दिसून येत आहेत.
निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा येणार समोर
सध्या मोजक्याच ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे पॅनल असा नारा देऊन कार्यकर्ते निवडणूक लढत आहेत. परंतु अजूनही बहुतांश कार्यकर्ते हे आपला वेगळा झेंडा घेऊन फिरत असल्याने महाविकास आघाडी कुठेच दिसत नाही.
पक्षपाती काही ठिकाणी आता नसली तरी, निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा समोर येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्ते आपआपल्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी नाही. पक्षपाती पद्धतीने ही निवडणूक होत नाही. पक्ष पातळीवरही असा काही निर्णय नाही. संमिश्र प्रतिसाद आहे.
- नाझेर काजी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
ग्रामपंचायत निवडणुका या कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. बहुतांश ठिकाणी एकत्रितरीत्या निवडणुका लढविण्यात येत आहेत. बहुतांश मंडळी एकत्र दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्ते स्वतंत्र लढत आहेत. परंतु महाविकास आघाडीकडून ग्रामविकासासाठी निधी देण्यात येईल.
- राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल आहेत. अगदी मोजक्याच ठिकाणी महाविकास आघाडी आहे. ज्या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र येऊन लढत आहेत. परंतु जिल्ह्यातील जवळपास ३५० ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतंत्र लढत आहेत.
- जालिंदर बुधवत, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
अविरोध ग्रामपंचायतींमध्ये दाखविले जाताहेत दावे
जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास २७ ग्रामपंचायती अविरोध आल्या आहेत. अविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्येही विविध पक्ष आपापल्या गटाच्या कोणत्या ग्रामपंचायती आहेत, याचे दावे करीत आहेत.