बुलडाणा : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २३ एप्रिल रोजी बुलडाणा येथे महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याहस्ते केले जाणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली़ या संमेलनाचे उद्घाटन राज्यभर प्रसिद्ध आणि सर्वपरिचित असलेले नागराज पोपटराव मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे, मुंबई हे राहणार आहेत. यावेळी मुख्य निमंत्रक मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख, कार्याध्यक्ष माजी जि. प. सभापती दिलीप जाधव व स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी साडेदहा वाजता हे उद्घाटन होणार असून तत्पूर्वी ग्रंथ प्रदर्शनी व विक्री स्टॉलचे उद्घाटन केले जाणार आहे. दरम्यान शाहीर डी. आर. इंगळे यांच्या 'लढाई जाती अंताची' या काव्यसंग्रहाचे तसेच डॉ. प्रतिभा वाघमारे - खोब्रागडे लिखित वामनदादांच्या गजलांचे सौंदर्य विश्व या पुस्तकाचे व प्रा. रवींद्र साळवे यांनी संपादित केलेल्या साहित्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच डॉ. सागर जाधव यवतमाळ, माधवराव गायकवाड अहमदनगर, विलास जंगले हिंगोली, वत्सलाबाई जनार्दन गवई भादोला, शाहीर चरण जाधव, मुंबई यांचा तसेच वामनदादा कर्डक राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन रवींद्र सावळे व आभार प्रदर्शन शशिकांत इंगळे करणार आहेत.
परिसराला ‘ताराबाई शिंदे साहित्य नगरी’असे नाव
साहित्य संमेलन परिसराला ताराबाई शिंदे साहित्य नगरी’ असे नाव दिले जाणार असून एका प्रवेशद्वाराला स्व. नरेंद्र लांजेवार तर एका प्रवेशद्वाराला शाहीर गवई - मिसाळ यांचे नाव दिले जाणार असल्याचीही माहिती यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला प्रा. रवींद्र इंगळे, शाहीर डी. आर. इंगळे, कुणाल पैठणकर, प्रा. शशिकांत जाधव, शैलेश खेडकर, शाहिनाताई पठाण, विजयाताई काकडे आदींची उपस्थिती होती.