- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विधानसभा निवडणुकीची धामधुम चांगलीच वाढली असून प्रचार सध्या रंगात आला आहे. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मतांचा जोगावा मागण्यासाठी सात विधानसभा मतदारसंघातील ५९ उमेदवार सध्या चांगलीच धडपड करत आहेत. या कसरतीत सरस ठरण्यासाठी मतांच्या आकड्यांचा मेळ जमविण्याचा खेळच तगड्या राजीकय पक्षांच्या उमेदवारांमध्ये सुरू आहे. हा आकडे जुळविण्याचा खेळ ज्याला जमला तो निवडणुकीच्या या दंद्वात वरचढ ठरला आहे. त्यामुळे आकड्यांचा हा खेळ कोणास जमतो यावरच सध्या राजकीय वर्तुळासह ग्रामीण भागातही चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, त्यासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीतील आकड्यांचा आधार घेत काही राजकीय धुरणी तथा रिंगणातील उमेदवारांची आकडेमोड सुरू आहे. बुथ निहाय झाले मतदान याचे दाखले देऊन आकड्यांचा मेळ जुळविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच मतविभाजनाचा फॅक्टर कितपत प्रभावी किंवा कमजोर याच्या अंदाज घेऊन त्या आधारावर निवडणूक प्रचारात अनुभवी उमेदवार जोर लावत आहेत. निवडणूक रिंगणामध्ये सध्या सर्वाधिक निवडणुका लढल्याचा अनुभव हा मलकापूरचे चैनसुख संचेती यांच्याकडे आहे. सहाव्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गेल्या वेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्यापेक्षा १६ टक्के मताधिक्य मिळवत बाजी मारली होती. सहाव्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्जावर यंदा आक्षेपही घेण्यात आला होता.मात्र ‘शाब्दीक’ युक्तीचा आधार घेत त्यावरही मात करण्यात ते यशस्वी झाले आहेत. यासोबतच वंचितचा बुलडाण्याचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंदखेड राजातील उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सर्वाधिक निवडणुका लढण्याचा अनुभव पाठीशी आहे. त्यांच्या खालोखाल कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांना अनुभव असून ते चौथ्यांदा भाग्य आजमावत आहेत.मात्र निवडणुकीत प्रचाराची हवा आणि कार्यकर्त्यांचा जोशही तितकाच महत्त्वाचा असतो. तो बनविण्यात रिंगणातील उमेदवारांपैकी कोण यशस्वी ठरून मतांचे आकडे आपल्याकडे फिरविण्यात कोण यशस्वी ठरतो यावरच रिंगणातील ५९ उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा हा मेळ कुणाला जमतो याबाबत सध्या उत्सूकता आहे.
गतवळी ८१ जणांची अनामत रक्कम जप्त२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांच्या आकड्यांचा खेळ फसल्याने ९४ उमेदवारांना फटका बसला होता. विशेष म्हणजे यात तब्बल निवडणूक रिंगणातील ८१ उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम गमावी लागली होती तर १३ जणांनी आपली अनामत रक्कम वाचविण्यात यश मिळवले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, शिवसेनेच्या चार, मनसेच्या तीन तर भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवारावर अनामत रक्कम जप्त होण्याची पाळी आली होती ही वस्तुस्थिती आहे. २०१४ च्या निवडणुकीत १०१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. गेल्या वेळी युती-आघाडीत अंतिमक्षणी चर्चा फिसकटल्याने युती तुटली होती तर आघाडीही फिस्कटली होती. परिणामी वेळेवर धावाधाव करून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात तगड्या पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षांनी गर्दी केली होती. युती व आघाडीतील पक्षही स्वतंत्र लढले होते. त्यामध्ये मतविभाजनामुळे निवडणूक रिंगणातील चांगल्या जाणत्यांचेही आकड्यांचे गणित फिसकटून त्यांच्यावर अनामत रक्कम गमावी लागण्याची नामुष्की आली होती. त्या तुलनेत यंदा सातही मतदारसंघात ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
९ हजार मतदारांची नोटाला पसंतीउमेदवारांची पसंती अथवा नापसंती ठरवण्याचा अधिकार निवडणूक विभागाने ‘नोटा’च्या माध्यमातून दिल्यानंतर त्याचा बुलडाणेकरांनी पुरेपूर वापर केला होता. तब्बल नऊ हजार ३७ मतदारांनी नोटा चा वापर गेल्या विधानसभा निवडणुकीत केला होता. आयोगाच्यावतीने गेल्या वेळी उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना दिल्या गेल्या होता. निवडणुकीत उभे असलेले उमेदवार पसंत नसल्यास मतदाराने नोटा चे बटन दाबावे असे त्यावेळी सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एक हजार ६७२ मतदारांनी नोटाला पसंती दिली होती. सर्वात कमी नोटा बटनाचा वापर जळगाव जामोदमध्ये झाला होता. बुलडाण्यात ९८८ जणांनी नोटाचा वापर केला होता.