बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 02:41 PM2024-11-18T14:41:58+5:302024-11-18T14:53:36+5:30

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र फेक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 NCP clarified that the letter of support to Shashikant Khedekar was fake | बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण

बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण

Sindkhed Raja Assembly Constituency : बुलढाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघात  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र व्हायरल होतं आहे. मात्र आता सिंदखेड राजामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीचे पत्र खोटं असल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं असून त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांची सही खोटी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलीय.
 
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र फेक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. अधिकृत उमेदवार मनोज कायंदे यांना डावलून शिवसेनेचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र हे पत्र खोटं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने देत शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

"आमदार शिवाजीराव गर्जे यांची सही ही बनावट आहे. पत्रावर चुकीचा मजकूर टाकून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आपण विचलित न होता पूर्ण ताकदीने मनोज कायंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा बनावट पत्राची दखल घेण्याची आवश्यकता नाही," असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सिंदखेड राजामध्ये अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात आलेल्या राजेंद्र शिंगणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजेंद्र शिंगणेंच्या उमेदवारीने नाराज झालेल्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना तिकीट दिले आहे. 

पत्रात काय म्हटलं होतं?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सिंदखेड राजा मतदार संघातून मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ह्याच मतदार संघात शिवसेना पक्षातर्फे शशिकांत खेडेकर हे पण उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सूचनेनेनुसार पक्षाकडून सिंदखेड राजा मतदार संघात शिवसेनेचे (महायुतीचे) अधिकृत उमेदवार श्री. शशिकांत खेडेकर यांना पाठींबा जाहीर करण्यात येत आहे, असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 NCP clarified that the letter of support to Shashikant Khedekar was fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.