ऑक्सिजनचा सातत्याने निर्माण होणार तुटवडा आणि व्हेंटिलेटरची कमतरता पाहता या वैद्यकीय उपकरणाचा आरोग्य विभागाला फायदा होणार आहे. प्रामुख्याने व्हेंटिलेटरची असलेली कमतरता पाहता बीआयपीएपी उपकरणाचा (वेगवान दाबाने रुग्णास ऑक्सिजन देणारे व्हेंटिलेटरसारखे उपकरण) लाभ होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या या काळात ऑक्सिजनचा गंभीर प्रश्न मधल्या काळात निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता व संचालक प्रशांत गिरबाजे यांच्या सहकार्याने आणि ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’च्या माध्यमाने राज्यातील जिल्ह्यांना ही वैद्यकीय उपकरणे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात या संघटनेने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी संपर्क साधून ही उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.
शुक्रवारी ५० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर आणि बीआयपीएपी उपकरण जिल्ह्यास उपलब्ध झाल्याची माहिती कोविड समर्पित रुग्णालयातील सूत्रांनी दिली. संस्थेने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी संपर्क साधताच तथा निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आणि उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी लगोलग पाठपुरावा केल्याने ही उपकरणे वेळत जिल्ह्यास उपलब्ध झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.