बुलडाणा: मुंबईत शनिवारी झालेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय नाट्यात माजी मंत्री तथा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आ. डॉ. राजेंद शिंगणे हे केंद्रबिंदू ठरल्याचे समोर येत आहे. राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत झालेला घटनाक्रम विषद केल्याने डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावाचीच चर्चा सर्वत्र होती. दरम्यान, असे असले तरी बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुर्तास तरी शांतता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही सध्या मुंबईमध्येच डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समवेत आहे. शांत संयमी आणि राजकीय घडामोडींची अचूक नस ओळखणाºया डॉ. शिंगणेंनी प्रथम अजित पवार यांच्या सोबत जात नंतर पुन्हा शरद पवार यांच्या गोटात प्रवेश केल्याचे बोलल्या जात असले तरी आपणास झालेल्या घटनाक्रमाची माहिती नव्हती. जसजसा घटनाक्रम घडला तसे याचे आकलन झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण शरद पवार यांच्या सोबत असून शेवटपर्यंत राहू, अशी भूमिकाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान गुरूवारपासून मुंबईत ठाण मांडून बसलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा बुलडाण्यात मात्र शुक्रवारी दुपारपासून कोणाशीही संपर्क झालेला नाही. गेल्या ३५ वर्षापासून राजकारणात असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे हे पाच वेळा आमदार राहलेले असून आघाडी शासनामध्ये दहा वर्षे त्यांनी राज्यमंत्री आणि कॅबीनेटमंत्री म्हणून काम पाहले होते. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ते एक परिपक्व नेते म्हणूनही ओळखले जातात. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्येही त्यांचा सहभाग राहलेला आहे. त्यामुळे प्रारंभी अजित पवार यांच्यासोबत राजभवनावर उपस्थित राहून नंतर पुन्हा शरद पवार गोटात डॉ. शिंगणे आल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.
घाईघाईत गाठली होती मुंबई
सत्ता स्थापनेच्या या नाट्यात अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात असले तरी शनिवारी पहाटे झालेल्या घडामोडींची ही बºयाच आधीपासून पूर्वतयारी केली गेली असल्याचे संकेत आहे. खुद्द माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांंनाही चार दिवसापूर्वीच तातडीने मुंबईत दाखल होण्याच्या सुचना मिळाल्या होत्या. अर्थात त्यांना कोणी बोलावले होते हे स्पष्ट नसले तरी ज्या घाईने डॉ. शिंगणे मुंबईत दाखल झाले होते, त्यावरून या घटना घडामोडींना काही दिवसापूर्वीच मुर्त स्वरुप दिल्या गेल्याचे स्पष्ट होत आहे. त्याची बºयापैकी कुणकुणही डॉ. राजेंद्र शिंगणे यांना लागलेली होती अशी चर्चाही बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.
आपल्यासाठी मोठा धक्का
अजित पवार यांंनी राजभवनात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा डॉ. राजेंद्र शिंगणेही त्यांच्या समवेत होते. मात्र त्यानंतर त्यांनी तेथून थेट शरद पवार यांचे सिल्वहर ओकमधील निवास्थान गाठले होते. शनिवारी झालेली ही घडामोड आपल्या ३५ वर्षाच्या राजकारणातील सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट होती, अशी भावनाही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.