- यदु जोशी
चिखली (जि. बुलडाणा) : शरद पवार यांच्या कुटुंबातील वाद वरवर शांत झालेला दिसतो. तो कधीही उफाळून येऊ शकतो. पवारांनी महाराष्ट्र बघण्यापेक्षा आधी घरात लक्ष घालण्याची गरज आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दानवे म्हणाले की पवार कुटुंबातील अलिकडचे वादळ पेल्यातील ठरले. मात्र, भविष्यात कोणत्याही क्षणी ते पुन्हा उफाळून येईल. या निमित्ताने कुटुंबकेंद्रीत असलेल्या त्या पक्षात छुपा संघर्ष सुरू असल्याचे समोर आले. भविष्यात तो संघर्ष अधिक तीव्र होईल.- भाजपने शरद पवार एके शरद पवार एवढचा सूर आळवला आहे. त्याचा पवारांना फायदा होईल असं वाटत नाही का?दानवे - आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांसाठी पवारांच्या पक्षातील अनेक मंत्री जबाबदार होते. पवार ही प्रवृत्ती आहे आणि तिचा विरोध हा झालाच पाहिजे. आमचा पवारविरोध आजचा नाही. आमच्या टीकेमुळे त्यांना सहानुभूती मिळण्याचा प्रश्नच नाही. ते महाराष्ट्राची सहानुभूती केव्हाच गमावून बसले आहेत. ईडीमध्ये कोणाचे नाव कशासाठी येत असते हे लोकांना बरोबर कळतं.- ईडीचा धाक दाखवून तुम्ही लोकांना भाजपत आणत आहात, असा पवार यांचा आरोप आहे...दानवे - पवार कुटुंबातील वादासाठीही ईडीचाच धाक कारणीभूत आहे, असंही ते उद्या म्हणतील. पवारांनी धनंजय मुंडे, छगन भुजबळ आदींना राष्ट्रवादीत आणले तेव्हा कोणता धाक दाखवला होता तेही सांगावे. मुळात त्यांचा पक्ष हा सरदारांची टोळी आहे. आता तर एकेक सरदार सोडून गेल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. आता घरातले सोडून जावू नयेत म्हणजे मिळविलं.- इतर पक्षातून येणारे वादग्रस्त असतील तर त्यांना धुऊन घेणारी वॉशिंग मशीन आमच्याकडे आहे, असं आपण मागे म्हणाले होते. मशीनचा उपयोग होतोय ना?दानवे - माझं ते वाक्य भाजपत येणाऱ्यांसाठी सरसकट नव्हतं. अगदी बोटावर मोजण्याइतपत लोकांसाठी तो निकष लावावा लागतो. भाजपचे काही नीतीनियम आणि संस्कार आहेत. इथे आल्यानंतर ते पाळावेच लागतात. त्याची जाणीव प्रत्येकाला करून दिली जाते आणि आमचा अनुभव असा आहे की फार अल्पावधीत इतर पक्षातून आलेले लोक तो संस्कार स्वीकारतात.- तुम्हाला काँग्रेसचे आव्हान मोठे वाटते की राष्ट्रवादीचे?दानवे : दोघांचेही वाटत नाही. राष्ट्रवादी आपसातील वादाने ग्रस्त आहे. काँग्रेसचे जहाज कॅप्टनशिवाय भरकटलेले आहे. श्रीमंत लोकांचा गरीब पक्ष अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. उमेदवारांच्या गळ्यात उमेदवारी तर टाकली पण पक्षाचे नेते त्यांच्याकडे बघायलादेखील तयार नाहीत.- ‘अब की बार १७५ पार’, असा नारा अजित पवार यांनी दिला आहे पण त्यांनाच सहकार्य करीत असलेले राज ठाकरे हे विरोधी पक्षाचा रोल लोकांना मागत आहेत, आपलं मत?दानवे : अजित पवारांचा दावा किती पोकळ आहे हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. गेल्यावेळी मिळालेल्या ८३ जागाही आघाडी टिकवू शकणार नाही. भाजप-शिवसेना युतीला २०० हून अधिक जागा मिळतील.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीचेच सरकार येणार हे विरोधकांनाही ठाऊक आहे. म्हणूनच राज ठाकरेंसारखे नेते सत्तेत येण्याची दिवास्वप्न रंगविण्याऐवजी विरोधी पक्षाचा रोल मागत आहेत. कालपर्यंत मेन हीरोच्या तोºयात वावरणारे लोक आज साईडरोल मागत आहेत. निकालानंतर ते कोरसमध्ये दिसतील. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसारख्या पक्षांची धडपड आज निदान विरोधी पक्षात तरी बसता यावे यासाठी सुरू आहे.मी सरपंच असताना मला शाळेत झेंडावंदनाला बोलावले. नवीन पँट लांब होत होती म्हणून मी ती आई, पत्नी व काकूंना कमी करायला सांगितली. तिघींनीही ती कमी केल्याने बरमुडा बनली. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची पाच-पाच कार्याध्यक्षांमुळे अशाच बरमुड्यासारखी अवस्था झाली आहे आणि आता तर तेच स्वत:ला बाजीप्रभू म्हणवून घेत धारातीर्थी पडण्याच्या तयारीत आहेत, बाजीप्रभूंनी छत्रपती शिवरायांसाठी प्राणाची आहुती दिली. थोरात मरणप्राय काँग्रेसला जगविण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत, असा चिमटा दानवे यांनी काढला.