Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:55 PM2019-10-04T15:55:12+5:302019-10-04T15:55:27+5:30
भाजप- काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत तिहेरी लढत होणार असल्याची स्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे.
- अनिल गवई
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या खामगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमदेवारीचा तिढा अखेर गुरूवारी सुटला. या मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीच्यावतीने शेगाव येथील नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे या मतदार संघात आता भाजप- काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत तिहेरी लढत होणार असल्याची स्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीकडून विद्यमान आमदार अॅड. आकाश फुंडकर यांचे नाव पहिल्याच यादीत निश्चित झाले. वंचित बहुजन आघाडीकडून शरद वसतकार यांना उमेदवारी देण्यात आली. यामतदार संघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून माजी आमदार आणि खामगाव मतदारसंघातील मातब्बर नेते दिलीपकुमार सानंदा यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे खामगाव मतदारसंघात प्रबळ उमेदवार शोधण्यासाठी पक्षनेतृत्वाला ऐनवेळी धावपळ करावी लागली.
दिलीपकुमार सानंदा यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर धनंजय देशमुख आणि काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण आणि त्यांच्या पत्नी राजकुमारी चव्हाण यांच्यापैकी एकाची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, धनंजय देशमुख यांनी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा निवडणूक लढणार असतील, तर आपण निवडणूक लढणार नसल्याची भूमिका पक्षनेतृत्वाकडे व्यक्त केली. त्यानंतर तेजेंद्रसिंह चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच, तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्याच एका गोटातून तीव्र विरोध करण्यात आला.
तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षाच्याच एका प्रबळ गटाकडून होत असलेल्या विरोधानंतर काँग्रेसनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांचे नाव अचानक चर्चेत आले.
गुरूवारी ज्ञानेश्वरदादा पाटील यांची उमेदवारी झाल्याने, खामगाव मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. परिणामी, खामगाव मतदारसंघात आता भाजप-काँग्रेस आणि वंचित आघाडीत तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र आहे.
वंचितचे उमेदवार शरद वसतकार यांनी गुरूवारी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल केला. तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील आणि भाजपचे उमेदवार अॅड. आकाश फुंडकर शुक्रवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज भरणार असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे इतर राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार उद्या शुक्रवारीच अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतरच या मतदारसंघातील लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे दिसून येते.
‘स्वाभीमानी’ शेतकरी संघटनेचा बार फुसका!
काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं-स्वाभीमानी महाआघाडीत खामगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याची चर्चा बुधवारी सायंकाळपासून रंगली होती. स्वाभीमानीचे कैलास फाटे यांना स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या स्वाक्षरीचा एबी फॉर्मही देण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी उशीरा घडलेल्या घडामोडीत खामगाव मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीकडून ज्ञानेश्वरदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेल्याची केवळ चर्चा ठरली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंडावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेची खामगाव मतदारसंघात चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसून येते.