खामगाव : बुलडाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक आणि दुर्गम भाग म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या विरोधात उमेदवारीसाठी काँग्रेसच्या ११ जणांनी शड्डू ठोकला आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीतही १२ जणांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असल्याचे दिसून येते.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्याचा समावेश असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात भाजप नेते आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांचे प्राबल्य आहे. या मतदार संघात त्यांनी विजयाची हट्रीकही केली आहे. सन २००५, २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग विजश्री खेचून आणली आहे. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांची दावेदारी अतिशय प्रबळ मानली जात आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी या मतदार संघात ११ जण रिंगणात आहेत. सलगच्या पराभवामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. मात्र, जळगाव जामोद मतदार संघात थेट पालकमंत्र्यांना आव्हान देण्यासाठी ११ जणांनी दंड थोपटले आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही तब्बल १२ जण उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी ११ तर वंचितच्या उमेदवारीसाठी १२ जणांनी पक्षश्रेष्ठींकडे मुलाखतही दिली आहे. त्यामुळे या मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचवेळी जळगाव जामोद मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सोडण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून जोरदार हालचाली सुरू आहेत. एका पाठोपाठ तीन निवडणुकांमध्ये या मतदार संघात काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदार संघात संगीत भोंगळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला हा मतदार संघ सुटल्यास संगीत भोंगळ हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा मतदार आहे. राष्ट्रवादीकडून पांडुरंगदादा पाटील, शैलेजा मोरे, नंदा पाऊलझगडे, प्रकाश ढोकणे, नगरसेवक जावेदभाई निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. शिवसेनेकडून शांताराम दाणे, संतोष घाटोळ, दत्ता पाटील आणि वासुदेव क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा आहे.
असे आहेत काँग्रेसचे इच्छूक उमेदवार!
काँग्रेसतर्फे प्रसेनजीत पाटील, स्वाती वाकेकर, संतोष राजनकर, रमेश घोलप, प्रकाश पाटील, ज्योती ढोकणे, अविनाश उमरकर, मो. अयुब शे. करीम, राजेश्वर देशमुख, श्याम डाबरे, रंगराव देशमुख यांनी मुलाखती दिल्या असून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.
वंचित आघाडीचे इच्छूक उमेदवार!चेतन घिवे, शरद बनकर, हमीद पाशा, भास्करराव पाटील, गणेश वहितकर, एस.टी.कलोरे, विजय हागे, रामकृष्ण रजाने, वकील इखारे, सातव गुरूजी, मंगेश मानकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.