विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: महंत शंकर गिरीजी महाराज संस्थान पळशी झाशी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर १० क्विंटल ७० किलोचा महारोठ तयार करण्यात आला. महंत शंकर गिरीजी महाराजांनी स्वतः सव्वा मनाचा म्हणजेच ५० किलोच्या प्रसादाची परंपरा सुरू केली. महाराजांनी घालून दिलेल्या कठोर नियमाप्रमाणे आजही महारोठ बनवला जातो. बनवण्याची पद्धत व साहित्य सामग्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वापरली जाते.
वाढती लोकसंख्या बघून रोठाचे प्रमाण आधीपेक्षा वाढविले आहे. यावर्षी वर्षी १० क्विंटल ७० किलो एवढा महारोठ तयार करण्यात आला. हा महारोठ शिवरात्रीच्या रात्री नऊ वाजतापासून गावातील युवक सूचीभ्रूत होऊन ओल्या अंगाशी तयार करतात. ‘हर हर महादेव, शंकरगिरी महाराज की जय, पलसी वाले बाबा की जय’ अशा घोषणांच्या गर्जनेत महारोठ तयार केला जातो. महारोठ निर्मितीची प्रक्रिया तसेच त्याचे स्वरूप पाहण्याकरिता परिसरासह इतरत्र ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात.
रात्री एक वाजेपर्यंत महारोठ तयार होऊन केळीच्या पानात व सुती कापडात बांधून टाकण्यात येतो. त्यानंतर महारोठाच्या जागेवर कापूर व अगरबत्ती लावून बाबांनी सुरू ठेवलेल्या धुनीतून विभूती गाळून रोठाच्या जागेवर टाकण्यात येते. सकाळी सूर्योदयापूर्वी पुन्हा भक्तगण अंघोळ करून ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत महारोठ बाहेर काढतात. महारोठाच्या प्रसादासह शिव मंदिरात आरती करून महारोठाचा नैवेद्याचे महाप्रसादाचे वितरण भक्तांना करण्यात येते. धगधगत्या अग्नीतून महारोठ बाहेर काढल्यानंतर कापडात ठेवलेला महारोठ पूर्णपणे शिजवून तयार झालेला असतो.
महारोठ बनवण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य
यावर्षी पळशी झाशी येथे १० क्विंटल ७० किलोचा महारोठ तयार करण्यात आला. याकरिता कणीक ३ क्विंटल ५० किलो, साखर ३ क्विंटल ७० किलो, १ क्विंटल २५ किलो तूप, १ क्विंटल २५ किलो दूध, १ क्विंटल सुकामेवा, तूप व दूध घालून हा प्रसाद तयार केला जातो. यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही.