बुलढाणा - राज्यातील अनेक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी, सर्वच राजकीय पक्ष जोर लावून मैदानात उतरले आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा सामना दिसून येतो. त्यामुळे, स्थानिक निवडणुकांमध्येही हा सामना असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र, अनेकदा स्थानिक राजकीय गणितं बिघडतात. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असंच गणित बिघडलं आणि महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आलं.
जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या निवडणूक जाहीर झाली असून राजकीय लढाई सुरू आहे. त्यामध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. तर निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवारी अंतिम मुदत होती.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दोन गट, भाजप आणि शिवसेना अशी चौरंगी लढत होणार होती. महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शिवसेनेला (उबाठा) एक जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज महाविकास आघाडीला विश्वासात न घेता कालपर्यंत सर्व अर्ज विड्रॉल करून घेतले. ज्या जागेचे आश्वासन दिले होते, त्या जागेसाठी महाविकास आघाडीने स्थान दिले नाही. त्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढवण्यात येत आहे. महाविकास आघाडीत या निवडणुकीत पडलेल्या फुटीमुळे बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे.
मेहकरमध्ये महाविकास आघाडीला झटका
मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी आणि शिंदे गटात रंगतदार ठरत हे. परंतू शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे नामनिर्देशन नामंजूर केले आहेत. त्यामध्ये आशिष रहाटे यांचाही समावेश आहे. नामनिर्देशन नामंजूरमुळे महाविकास आघाडाली बाजार समिती निवडणूकीत पहिलाच झटका बसला आहे.