जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज ५०० ते एक हजाराच्या दरम्यान रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे, तसेच आता मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. शहरातील प्रत्येक वार्डात व गल्लीत पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक नागरिक घरातच राहण्याला प्राधान्य देत आहेत.
तसेच आजूबाजूच्या नागरिकांशीही संपर्क करीत नाहीत. अशावेळी मोलकरणींनाही घरात न बोलावण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे, तसेच आगामी काळात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोलकरणींवर संकट ओढवले आहे.
सध्या कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. परिणामी, अनेक कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी ही घरकाम करणाऱ्या महिलांवर येऊन पडली आहे. अशातच आता घरकामही बंद झाले, तर अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. शहरात एक हजारापेक्षा जास्त मोलकरणींची संख्या आहे. मोलकरणींना कामासाठी एका भागातून दुसऱ्या भागात जावे लागते. सध्या शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस विचारणा करीत आहेत. त्यामुळे कामावर जाताना मोलकरणींना या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एका घरातून मिळतात हजार रुपये
घरात स्वयंपाक करणाऱ्या तसेच धुणी- भांडी करण्याचे काम वेगवेगळ्या मोलकरणी करतात. स्वयंपाक करणाऱ्या मोलकरणी एकाच दिवसात वेळेचे नियोजन करून दोन ते तीन घरात काम करतात.
तर धुणी - भांडी करणाऱ्या मोलकरणीही तीन ते चार घरी काम करतात. एका घरातून महिन्याला हजार रुपये मिळतात. त्यामुळे एका मोलकरणीला महिन्याला चार ते पाच हजार रुपये मिळतात.
कोरोनाने अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कामावर येऊ नका, असे सांगितले आहे. त्यातच सध्या सर्व बंद असल्यामुळे रोजगारही हिरावला आहे. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सुनीता पवार.
गतवर्षी लॉकडाऊनमुळे काम बंद होते. त्यातच पती व मुलेही घरीच होती. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला. आर्थिक परिस्थिती ढासळली होती. दागिणे गहाण ठेवून तसेच उसणे पैसे घेऊन कुटुंबाचे पालन पोषण करावे लागले. आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर तेच दिवस पुन्हा येणार आहेत.
- संगीता उंबरकार.