- अनिल उंबरकारलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : इलेक्ट्रॉनिक आणी टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई झाल्यानंतर मोठया कंपन्याद्वारे नोकरीसाठी निवड झाली. परंतु, खाजगी नोकरी न करता समाजाचे ऋण फेडण्यासाठी केंदीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचे ठरवले. रोज आठ तास अभ्यास व जिद्द कायम ठेवल्याने यशाला गवसणी घालु शकलो, अशा भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून ७१० व्या रँकमध्ये उत्तीर्ण झालेल्या अभिजीत सरकटे यांनी व्यक्त केल्या. त्यांच्याशी साधलेला संवाद...
युपीएससी परिक्षेत यश मिळविण्यासाठी काय केले?विद्यार्थी दशेतूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचा मानस होता. दिवसातून सलग आठ तास अभ्यास करुन स्पर्धा परिक्षेची तयारी केली. अपयश मिळाल्यानंतरही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याची जिद्द कायम होती. सलग तीन वर्ष दररोज आठ तास अभ्यास करुन यश मिळवले.
कौटुंबिक स्तरावरुन कोणती मदत झाली?वडील विश्वनाथ सरकटे रिसोड येथे राज्य परीवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत तर आई मीना सरकटे शेगाव पंचायत समिती अंतर्गत लासूरा येथे शाळेत शिक्षिका आहे. शालेय शिक्षण शेगावात हरलालका शालेत व महाविद्यालयीन शिक्षण नगरपालिकेच्या महाविद्यालयात घेतले. कुटुंबासह शैक्षणिक प्रवासात सर्वांची मदत झाली.
स्पर्धा परिक्षेतील यशामध्ये कोणत्या अडचणी येतात?युपीएससीमध्ये दोन वेळा प्रयत्न असफल झाला. जिओग्राफी विषयाने दोन वेळा घात केला. त्यामुळे मानववंश शास्त्र हा विषय घेतला. तो विषयच करीअरमध्ये कलाटणी देणारा ‘गेम चेंजर’ ठरला. अपयशाने विचलित न होता तज्ञांचे मार्गदर्शन हेच यशाचे सूत्र ठरले.
स्पर्धा परिक्षेकडे वळण्यासाठी काय प्रेरक ठरले?इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती पुरस्कार २०१० मध्ये मिळाला. पुरस्कार घेण्यासाठी कार्यक्रमात गेलो तीथे उत्साहित झालो. तेव्हाही मोठा अधिकारी बनावं, असं मनात आलं.
युपीएससीच्या मुलाखतीचा अनुभव कसा असतो?४० मिनिटाच्या मुलाखतीमध्ये आई-वडील अमरावती जिल्ह्यातील असल्याने पॅनलमधील अधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील विविध प्रश्न विचारले. मेळघाटमध्ये कोण कोणत्या जमाती आहेत, गोंड जमातीमध्ये काय विशेष वाटलं, त्यांच्या लग्नाची परंपरा, तिथले जिल्हाधिकारी काय करतात. त्यानंतर अचानक चीन-डोकलाम बद्दलची माहिती विचारली. हायकिंग व ट्रॅव्हलींग, इकॉनॉमी, राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले. प्रारंभी दडपण आलं,. मात्र, नंतर मुलाखत ही संवादासारखी ठरली.