२०२०-२१ च्या रब्बी हंगामात महाराष्ट्र शासनाने हमीभावाने भरडधान्य मका व ज्वारी खरेदी करण्याचे ठरविले आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील मकासाठी ३८० आणि ज्वारीसाठी ५०५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी नियमाने ३० एप्रिलपूर्वीच पूर्ण केलेली आहे. तरीही प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी दररोज मेहकर खरेदी-विक्री संस्थेतील अधिकारी व व्यवस्थापकांना विचारणा करण्यासाठी आपली पायपीट करीत आहेत. सतत सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल होताना दिसत आहेत.
अशातच पेरणीसाठी खते व बियाणे आणण्याकरिता शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या मका आणि ज्वारी मालावर अवलंबून आहेत; परंतु हमीभावाने मका, ज्वारी खरेदी होत नसल्याने आता करावे तर काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर मोजमाप सुरू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
खरेदीचे आदेश नसल्यामुळे खरेदी सुरू झाली नाही. आदेश प्राप्त होताच खरेदी सुरू होईल. ज्वारी आणि मका खरेदी करण्यासाठी शेतकरी वारंवार संस्थेकडे विचारणा करीत आहेत. त्यामुळे शासनाकडून ज्वारी व मकाचे खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश प्राप्त होताच माल मोजमाप करण्यास विलंब लागणार नाही.
मधुकर रहाटे, अध्यक्ष ख. वि. संस्था, मेहकर.