अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: शहरातील पाणी पुरवठय़ाची घडी बसवताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वारंवार पालिकेला कोंडीत पकडण्यात येत आहे. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. २0१३ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेचा ताबा सोडत नसल्याने, पालिकेला प्रति महिना दीड कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे.एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला पालिका पाणीपुरवठा करते. त्यासाठी शहरापासून सुमारे २२ किलोमीटरपर्यंत पाइपलाइन आहे. यामध्ये गेरू माटरगाव ते जळका भंडग येथील जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असून, शुद्धीकरण झालेले पाणी दोन टाक्यांमध्ये आणून वितरणाची जबाबदारी पालिकेची आहे. यात मात्र उभय संस्थांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. त्यामुळे येथील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. शहराच्या पाणीपुरवठय़ाची जबाबदारी पालिकेकडे देण्यासाठी मजीप्राकडे वारंवार पत्रव्यवहार झाला; पण मजीप्राकडून थकीत रकमेसाठी पालिकेला वेठीस धरल्या जात असून, योजनेचा ताबा देण्यासही नकार दिल्याची धक्कादायक माहिती आहे. देखभाल दुरुस्तीचा खर्च पालिकेलाच करावा लागतो.
असा आहे खर्च!मजीप्रा, वीज वितरण, पाटबंधारे विभाग, दूरसंचार आणि पालिका यांच्यावर पुरवठय़ाची दामोदार आहे. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला धरणापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठय़ासाठी सुमारे २ कोटी रुपये, वीज वितरण कंपनीला वीज बिलापोटी ५0 लाख रुपये, टेलिफोन बिल, पाटबंधारे विभागाचा खर्च आणि वितरणाचा खर्च मिळून पालिकेला सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च येतो.
२६ कोटींची कोंडीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पालिकेकडे २६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये १२ कोटी रुपयांच्या मूळ रकमेचा समावेश असून, १४ कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. थकीत रक्कमेचा आधी भरणा करा, नंतरच योजनेचा ताबा घ्या, अशी भूमिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतल्या जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावरील आर्थिक बोजा वाढत असल्याचे दिसून येते.
सततचा तोटा ठरणार घातक!महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पाणी विकत घेतल्यानंतर पुरवठय़ावरही खर्च करावा लागत असल्याने योजनेवर दुपटीने खर्च करावा लागतो. त्यामुळे खामगाव नगर पालिका प्रशासन पाणीपुरवठय़ाबाबत तोट्यात असल्याचे दिसून येते. सततच्या तोट्यामुळे पाणी पुरवठा योजना आवाक्याबाहेर जाण्याची भीतीही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
खासगीकरणातून पालिकेची होणार बचत!पाणी पुरवठय़ाची घडी बसविण्यासाठी तसेच रकमेच्या बचतीसाठी पाणी पुरवठा योजनेचे खासगीकरण करण प्रस्तावित आहे. यामध्ये धरणापासून ते शहरात वि तरणापर्यंतच्या पाणीपुरवठय़ाची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे; मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजनेचा ताबा दिल्या जात नसल्याने पालिकेचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान, या योजनेचे खासगीकरण केल्यानंतर कंत्राटदाराचे बिल थकल्यास पाणी पुरवठा योजना ठप्प होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेचे सवरेतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यासाठी पालिका प्रयत्नरत आहे.- सतीशआप्पा दुडे, पाणी पुरवठा सभापती, नगर परिषद, खामगाव.