- अनिल गवई खामगाव : सृष्टीतील प्रत्येक मोठी वस्तू आणि गोष्ट सुरूवातीला लहानच असते आणि म्हणूनच आयुष्याच्या वाटेत कोणत्या कामाचा, गोष्टीचा अजिबात कमीपणा न बाळगता हवं ते मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नं करा. प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न एकदिवस हमखास यशस्वी होतो, हा आपला दावा आहे. ‘कौन बनेगा करोडपती ’ मध्ये ‘करोडपती’झालेल्या आणि अमरावती जिल्ह्यातील ‘खिचडीवाल्या काकू’ बबीता ताडे यांच्याशी साधलेला संवाद.
आपल्या यशस्वी वाटचालीत महत्वाचे योगदान कुणी दिले?
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या वाटचालीत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे महत्वाचे योगदान असते. मात्र, तुमच्या मनातील जिद्द, परिश्रम आणि संघर्षच तुम्हाला घडवित असतात. प्रतिकुल परिस्थितीत राखलेला संयम प्रत्येकाला यशस्वी होण्याची हमखास संधी देते.
स्त्रीयांसमोरील नवी आव्हानं कोणती?पूर्वी देशात मातृसत्ताक कुटुंब पध्दती अस्तित्वात होती. कालांतराने पितृसत्ताक पध्दती अस्तित्वात आली. सद्यस्थितीत ५० टक्के समानता दिसत असली तरी, स्त्रीयांवरील बंधनं अजिबात कमी झालेली नाहीत. आधुनिक युगात महिला असुरक्षीत असून महिलांची महिलांशीच असलेली अंतर्गत स्पर्धा हे मोठं आव्हान आजच्या महिलांसमोर आहे.
मनुष्याच्या यशातील प्रमुख अडथळा कोणता? स्वत:ला कमी समजणं हा मनुष्याच्या जीवनातील सर्वातमोठा अडथळा आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणताही मनुष्य जीवनात हवं ते प्राप्त करू शकतो. सकारात्मक दृष्टीकोन, प्रामाणिक प्रयत्न, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक मनुष्य यशस्वी होवू शकतो. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा शुभ आहे. शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही. म्हणूनच जीवनात नवीन काहीतरी धडपड करा, यश तुमच्या मुठ्ठीत आहे. आपल्या यशस्वीतेमागे वर्तमानपत्रांची भूमिका काय?अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून आपण यश मिळविले. जीवन सुकर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी वर्तमान पत्राची भूमिका फार मोलाची राहीली. वाचनाची आवड असल्याने घरी वर्तमान पत्र लावले. यातूनच सामान्य ज्ञान वाढले. थोरा मोठ्याच्या प्रेरणादायी कथा वर्तमान पत्रातून वाचायला मिळत होत्या. त्यामुळे वडिलांशी हट्ट करून घरी वर्तमानपत्र लावले होते. वर्तमान पत्रातील माहितीद्वारेच सुरूवातीच्या काळात मी माझं सामान्य ज्ञान अपडेट करीत राहीली. परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळा आला. मात्र, वर्तमानपत्र वाचनाची सवय कायम ठेवली. त्याचा पुढे खूप फायदा झाला.
जीवनात अनेक आव्हानं आहेत. या आव्हानांना अजिबात न घाबरता वाटचाल केली की, यश तुमच्या कवेत येते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात. संघर्ष येतो. संघर्षातूनही मनुष्याचे जीवन फुलविता येते. प्रत्येक माणुस हा एक ‘सेलिब्रिटी’आहे. आपल्यातील क्षमता ओळखण्याची गरज आहे.
- बबीता ताडे