सिंदखेडराजा: ग्रामीण भागातही काेराेना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. केवळ निर्बंध असल्याने गावाकडची मंडळी लग्न, दवाखाना इतर कामांसाठी बाहेर पडत आहेत़ त्यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे़ अशा परिस्थितीत गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारून सौम्य लक्षणे असलेल्यांना त्याच सेंटरमध्ये ठेवून उपचार करण्याची गरज आहे.
कोरोनाकाळात मागील वर्षी ज्या उपाययोजना केल्या गेल्या, त्यात गावातील शाळा क्वारंटाईन सेंटरमध्ये बदलण्यात आल्या होत्या़ त्यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना गावाबाहेर ठेवले जात होते़ तोच प्रयोग आता पुन्हा करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या नगण्य असली तरीही गावातील कोरोनाचे लक्षण असलेल्या नागरिकांना किंवा ज्यांना गृहविलगीकरणात ठेवण्याच्या सूचना आहेत अशा आणि सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना या सेंटरमध्ये ठेवल्यास गावातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यास मदत होऊ शकणार आहे. प्रशासनाने याबाबत विचार करून कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
मागील वर्षी याच महिन्यात कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती.भीतीने प्रत्येकजण घराबाहेर पडायचे तर सोडा दाराबाहेर डोकावून पाहत नव्हता़ परंतु, यावर्षी परिस्थिती बदलली. लोकांमधील भीती दूर झाली असली तरीही कोरोना यावर्षी नव्या रूपात आहे,अधिक भीषण आहे. भिण्याचे कारण नसले तरीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी गावातील शाळा क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतरित केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आपण रोखू शकतो.
ॲड. राजेंद्र ठोसरे,सिंदखेडराजा