लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: ठरलेल्या कालावधीनुसार येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, नव्याने नगराध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संभाव्य दावेदारांबाबत नागरिकांत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
मालेगाव नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर या स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेची सार्वत्रिक निवडणूक जवळपास तीन वर्षांपूर्वी पार पडली. यात आरक्षणानुसार मालेगावच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिनाक्षी सावंत यांना प्राप्त झाला. आता ठरलेल्या कालावधीनुसार त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ५ महिन्यानंतर संपुष्टात येणार असून, नव्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने पाच महिन्यांपूर्वीच आरक्षण सोडतही काढली आहे. त्यानुसार मालेगाव नगर पंचायतचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ठरले आहे. या आरक्षणानुसार सद्यस्थितीत या पदासाठी सहा महिलांकडे संभाव्य दावेदार म्हणून पाहिले जात आहे. त्यामध्ये अमित झनक गटाच्या रुपाली शशिकांत टनमने आणि अफसानाबी सय्यद तस्लिम, राष्ट्रवादीच्या रेखा अरूण बळी, शिवसेनेच्या कविता देवा राऊत, शिवसंग्रामच्या सुषमा अमोल इंगोले आणि सरला चंदू जाधव यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत मालेगाव नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व असून, शिवसेना व शिवसंग्राम यांनी हातमिळवणी केल्यास नगराध्यक्ष पद त्यांच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी पूर्वीच गुडघ्याला बाश्ािंग बांधून तयार झालेल्या पुरुष वर्गातील दावेदारांचा मात्र जाहीर झालेल्या आरक्षणानंतर पुरता हिरमोड झाला आहे. तथापि, नगराध्यक्ष पद आपल्याच गटाकडे राहावे यासाठी त्यांच्याकडून आतापासूनच रणनिती आखली जात असल्याचे दिसत आहे.