लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : दोन वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी घडली. कारने दोन ऑटोसह दुचाकीला दिलेल्या धडकेत आठ प्रवासी तर बसस्थानकावर ब्रेक फेल झाल्याने फलाटावरील खांबावर बस आदळून झालेल्या अपघातात बसमधील चिमुकल्यासह सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मारुती अर्टीका क्र.टी.एस.0८/एफ क्यू.५८१७ ही गाडी भरधाव वेगात मुंबईकडे जात होती. महावितरण सबस्टेशनजवळ तिने विरुद्ध दिशेने येत असलेल्या ऑटोरिक्षा क्र.एम.एच.१९-बी.यू.१७४४ यांसह त्याच्या पाठीमागील विनानंबरच्या ऑटोरिक्षाला व मोटारसायकलीला उडविले. एक ऑटो मौजे नरवेल तर एक मौजे हरसोडा येथून मलकापूरकडे येत होता. या विचित्र अपघातात मोटारसायकलस्वार विजय निनू पाटील (वय ५३) रा.धामणगाव, व्दारकाबाई लक्ष्मण हेलोडे (वय ७0), धोंडू चंदु पाटील (वय ७२), नंदु नीळकंठ सातव (वय ३0), विजय उखर्डा इंगळे (वय ३२) सर्व रा.नरवेल, संजय हरिभाऊ मोरे (वय ३५) रा.हरसोडा, कांचन संतोष माने (वय १८), सखुबाई संतोष माने (वय ३२) रा.काळेगाव असे आठ जण जखमी झाले. जखमींपैकी ५ रुग्णांवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात तर तीन रुग्णांवर कोलते हॉस्पिटलात उपचार करण्यात आले. रुग्णांची प्रकृती सुखरूप असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. मलकापूर तालुक्यात या आठवड्यात सलग दुसर्या दिवशी अपघाताच्या घटना घडत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाकडून रुग्णांना वेळेवर उपचार सुविधा मिळत असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांनी लोकमतशी बोलताना दिली. दुसरीकडे मलकापूर परिसरात गेल्या महिनाभरापासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची त्वरेने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
ब्रेक फेल झाल्याने स्थानकातील खांबावर धडकली बसबसचे ब्रेकफेल झाल्याने बस स्थानकातील खांबावर जोरदार धडकली. त्यात सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता घडली. मलकापूर आगाराची बस क्रमांक एमएच ४0 - एन ८0९0 सकाळी ६ वाजता नरवेल येथून मलकापूर बसस्थानकावर पोहोचली. चालकाने शेवटी बस थांबविण्यासाठी ब्रेक दाबले असता, ब्रेक लागले नाहीत. बस वेगाने बसस्थानकावर घुसली. त्यात बस खांबावर धडकली. बसमधील भीवसेन आनंदा रावळकर (वय ५८), रमेश विष्णू चव्हाण (वय ६0), शुभांगी प्रभाकर चंदनकार (वय १२), प्रतीक्षा मोहन सावळे (वय १२), कार्तिक मधुकर कोलते (वय १२), वैभव राजेंद्र बर्हाटे (वय १२) असे सहा प्रवासी जखमी झाले. जखमी विद्यार्थिनींच्या फोनवरून नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ, पत्रकार वीरसिंह राजपूत आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.