- हनुमान जगतापलोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने क्वारंटीन करण्यात आलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचा प्रकार रविवारी समोर आला. स्वच्छतेचा अभाव, पाण्याची व जेवणाची व्यवस्थीत सोय नसल्याचा आरोप त्यांनी केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशातच एक पॉझिटीव्ह रुग्ण मलकापूरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्या रुग्णाने खाजगी रूग्णालयातही उपचार घेतल्याचे उघड झाले त्यामुळे शहरात धास्ती निर्माण झाली. त्या धरतीवर शुक्रवारी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, डॉ. जी. ओ. जाधव, डॉ. चेतन जाधव देशमुख यांच्यासह तीन अशा सहा जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व तपासणी अहवाल पाठविण्यात आले. परंतू क्वारंटीन रुग्णांसाठी सुविधांचा अभाव असल्याचा प्रकार समोर येत आहे.त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालय व बाथरूममध्ये पाणी नाही. साफसफाई नाही, बेडशीट बदलल्या जात नाही, जेवण अपुऱ्या प्रमाणात आणि तेही खाली टाकून कर्मचारी चालले जातात यासह अनेक गंभीर आरोप अॅड. हरीश रावळ, डॉ. जी.ओ. जाधव, डॉ. चेतन जाधव देशमुख यांच्यासह सध्या क्वारंटीन म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांनी केले आहेत. दरम्यान, क्वारंटीन असलेले सात रुग्ण पळून गेल्याचा दावा अॅड. हरीश रावळ यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल!सोशल मिडियावरही या रुग्णांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुर्लक्षीत कारभार समोर आला आहे. कोरोना बाबतीत केंद्र व राज्य शासन अतिशय संवेदनशील आहे. अशा परीस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागतो.यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी मी सध्या आपल्याशी बोलू शकत नाही. असा संदेश मोबाईलवर पाठविला. मलकापूरातील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने या विषयी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे जाब विचारायचा कुणाला हा प्रश्न देखील अनुत्तरित राहतो. दुसरीकडे सोशल मिडियावर या प्रकाराची चर्चा असल्याने मलकापूर परीसरातील नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली.
मलकापूर : क्वारंटीन असलेल्या रुग्णांची हेळसांड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:06 AM