मलकापूर (जि. बुलडाणा) : येथील फुकटपुरा भागातील दोन कुटुंबांमध्ये छेडखानीच्या कारणावरून सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये पिता-पुत्रांवर शेजारीच राहणार्या दोघांसह तीन ते चार महिलांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडली. शहरातील फुकटपुरा भागातील विष्णूनगरात नवृत्ती कडू ठोसर (वय ४0) हे आपल्या कुटुंबासह राहतात. या परिवारातील महिलांची शेजारीच राहणारे कुटुंबीय छेड काढत असल्याची तक्रार आहे. याबाबत ठोसर कुटुंबातील महिलांनी तीन दिवसांपूर्वी शहर पोलिसांत तक्रारही दिली. दरम्यान, या तक्रारीबाबत जाब विचारत बुधवारी राजू शंकर खंडारे (४0), संजू शंकर खंडारे यांच्यासह तीन ते चार महिलांनी ठोसर कुटुंबीयांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यामध्ये नवृत्ती कडू ठोसर, विनायक नवृत्ती ठोसर (१६) गंभीर जखमी झाले. खंडारे कुटुंबातील एका जखमीस उशिरा दवाखान्यामध्ये भरती करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी जखमींना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
छेडखानीच्या वादातून मलकापुरात हाणामारी
By admin | Published: September 24, 2015 1:23 AM