खामगाव: न्यायालयाच्या आदेशाने महसूलच्या जागेवरून अतिक्रमण काढताना एका इसमाने प्रचंड धुमाकुळ घातला. प्रसंगावधान राखत, पोलीसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. मात्र, पोलीसांच्या कोणत्याही कारवाईला न जुमानता त्याने लोखंडी जाळीवरून उडी घेत त्याने पोलीस स्टेशनमधून धूम ठोकली. पाठलाग करणाऱ्या पोलीसांचा रस्त्यावरील नारळ पाण्याच्या दुकानातील कोयता घेत, सिनेस्टाईल थरार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता दरम्यान शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. एका पोलीसासह काही वाटसरूही जखमी झाले.
महसूल प्रशासनाची अतिक्रमित जागा खाली करण्यासाठी खामगाव न्यायालयाने आदेश दिला. त्यानुसार महसूल प्रशासन, नगर पालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी- कर्मचारी रेल्वे गेट परिसरातील घटनास्थळी पोहोचले. नायब तहसीलदार हेमंत पाटील आणि उपस्थितांनी कोर्टाचा आदेश दाखवित घर खाली करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे बिथरलेल्या दीपक परदेशी याने घटनास्थळी धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे प्रसंगावधान राखत पोलीसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेले. मात्र, तेथे पोलीसांना न जुमानता ‘मला न्याय हवा...मला बेघर करताहेत’ असे म्हणत लोखंडी जाळीवरून उडी घेत पोलीस स्टेशनमधून धुम ठोकली. पोलीस स्टेशन आणि त्याच्या घराच्या मधात असलेल्या एका नारळ पाण्यावाल्याजवळील कोयता हिसकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर तसेच अतिक्रमित जागेच्या परिसरात प्रचंड धुमाकुळ घातला.
पोलीस जखमी; वाटसरूमध्ये पसरली दहशतहातात कोयता घेत दीपक परदेशी याने सिनेस्टाईल थरार निर्माण केल्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात एकच गदारोळ माजला. त्याला पकडण्याच्या नादात प्रफुल्ल टेकाडे नामक पोलीस पाय घसरून पडले. त्याने इतरांनाही भयभीत करण्याचा प्रयत्न केला.
पोलीसांनी शिताफीने घेतले ताब्यातप्रचंड धुमाकुळ घालणाऱ्या परदेशीला पकडण्यासाठी शहर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले. त्याच्या हातातील कोयता हिसकावून घेत त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.