चिखली : तालुक्यातील अंबाशी फाट्यानजीक शेतात मृतावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीचा खूनच झाल्याचे अखेर निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्यासह आरोपींना अटक तसेच मृतकाची ओळख पटविण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. मृतकाचे नाव संजीव भीमराव जाधव (३७, रा. नांद्राकोळी, ता.जि. बुलडाणा) असे आहे.
अंबाशी फाटा परिसरातील एका शेतात मृतक संजीव जाधव याचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी आढळला होता. धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याचा संशय होता. मात्र, मृतकाची ओळख पटली नसल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत मृतकाची ओळख पटविण्यासह या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित म्हणून बुलडाणा तालुक्यातीलच सव येथील गोपाल लव्हाळे (२५) यास ३ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. चिखली पोलिसांनी नांद्राकोळी येथीलच भारत गजानन विरसिद (२८) यास देखील अटक केली आहे. भाड्याने बोलविलेल्या वाहनचालकाचे दागिने लुटण्याच्या नादात मृतकाने स्वत:चाच जीव गमावल्याची बाब या प्रकरणात समोर आली आहे.
असे घडले हत्याकांड
मुख्य आरोपी गोपाल लव्हाळे याच्याकडे कार आहे. व तो ती कार भाड्याने चालवितो. याची माहिती मृतक संजीव जाधव व या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी भारत वीरसिद या दोघांना होती. ते दोघे २ डिसेंबर रोजी चिखली येथे आले होते. त्यांनी आरोपी लोखंडेची कार भाड्याने केली होती. आरोपी गाडीसमवेत अंबाशी फाटा येथे पोहोचल्यानंतर मृतक संजय व भारत हे दोघे गोपालच्या कारमध्ये बसले. मात्र दोघांची नजर गोपाल याच्याकडील अंगठी व चेनवर पडली. तेथून जवळच असलेल्या काटोडा या गावाकडे गाडी नेण्यास सांगून रस्त्यावर दोघांनी शौचास जायचे आहे, असे सांगून गाडी थांबवायला सांगितली. यावेळी गोपालच्या अंगावरील दागिने चाकूचा धाक दाखवित हिसकावण्याचा प्रयत्न संजय आणि भारतने केला. यावेळी झालेल्या झटापटीत गोपालने भारतच्या हातातील चाकू हिसकावला आणि मृतक संजीव याच्यावर वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे पाहून भारत घटनास्थळावरून पळून गेला. तसेच मुख्य आरोपीनेदेखील तेथून पळ काढल्याची माहिती आहे.
असा झाला उलगडा
सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना अंबाशी येथील प्रकाश देशमुख यांच्या शेतात मृतदेह दिसल्याने घटना ही उघडकीस आली. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सव येथून गोपालला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याशी झटापट करणाऱ्या दोघांना तो ओळखत नसल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. दरम्यान मोबाइल नंबरच्या आधारे रात्री ११ वाजता चिखली पोलीस नांद्रकोळी येथे पोहोचले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली.