बुलडाणा: हवामान बदलाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा संवेदनशील जिल्हा असल्याने शेती व्यवस्थापनात मदत होण्यासोबतच हवामान बदलापासून सुरक्षा व सतर्क करण्यासाठी जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना नियमित स्वरुपात हवामानाचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पाच दिवसांच्या हवामानाचा हा अंदाज असून मंगळवार आणि शुक्रवारी मराठी भाषेतून तो दिला जात असल्याची माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्राचे विषय विशेषज्ञ मनेश यदुलवार यांनी दिली. गेल्या दोन वर्षापासून हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दोन दिवसापूर्वी हवमानात अचानक झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
बुलडाणा येथे जिल्हा कृषी हवमान केंद्र कधी सुरू झाले? बुलडाणा येथे मार्च २०१९ पासून जिल्हा कृषी हवामान केंद्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला मराठी भाषेत कोणत्याही माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. १८ हजार शेतकऱ्यांपर्यंत सध्या आम्ही पोहोचत असून टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांची संख्या यात वाढविणार आहोत. आत्मा कार्यालयाकडूनही यासाठी सहकार्य मिळत आहे.
सध्या कोठे कोठे हवमान केंद्र उभारले गेले आहेत?
हवामान संवेदनशील जिल्ह्यात प्रामुख्याने स्वयंचलीत हवामान केंद्र उभारले गेले आहेत. विदर्याभामध्ये गडचिरोली, भंडारा, नागपूर, अमरावती, वाशीम या ठिकाणी अकोला कृषी विद्यापीठातंर्गत हवामान केंद्र उभारण्यात आले आहेत. बुलडाणा येथील हवामान केंद्र हे हैद्राबाद येथील कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने दिले आहे. त्याचाही सध्या हवामान बदल व कृषी विषयक सल्ला देण्यासाठी उपयोग होत आहे.
आणखी एक हवमान केंद्र उभारण्यासंदर्भात हालचाली आहेत का?
हो.बुलडाण येथे येत्या काळात सुमारे १२ लाख रुपये खर्च करून भारतीय हवामान विभागाच्या अखत्यारित अद्ययावत स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. कोरोना संसर्गामुळे त्यास विलंब झाला आहे. मात्र ते उभारल्यानंतर अधिक अचूक माहिती उपलब्ध होईल.
नव्या उभारण्यात येणाऱ्या हवामान केंद्राचा फायदा काय?
हे केंद्र उभारल्यानंतर मातीचे तापमान, सुर्याची किरणे, दवबिंदूचा आकार, बाष्पीभवन, मातीतील अेालावा हा दैनंदिनस्तरावर मोजण्यास मदत मिळले. आदर्श निरीक्षण त्याद्वारे एक प्रकारे होईल. ५५ बाय ३६ मिटरच्या जागेत ते उभारण्यात येणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या दोन अधिकाऱ्यांनी गेल्या जुलै महिन्यात त्यानुषंगाने येथे भेट देवून पाहणी केली आहे.
दैनंदिन अंदाज कसा वर्तवला जातो?
स्वयंचलीत हवामान केंद्राकडून नोंदवलेली निरीक्षणे आणि मागील ३० ते ४९ वर्षातील उपलब्ध आकड्यांचा साकल्याने विचार करून हवमाना कसे राहील, मेघाच्छादन राहील का? याबाबत अंदाज वर्तविल्या जात आहे. येत्या काळात यातमध्ये अद्ययावत यंत्रणा आल्यानंतर अधिक अचूकता येण्यास मदत होणार आहे.