अंढेरा : अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिक कर्ज मिळेल अशी आस हाेती. मात्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अंढेरा अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जच मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जे शेतकरी खरीप हंगामात पिक कर्ज वाटपापासुन वंचित राहले त्यांना रब्बी हंगामात पिक कर्ज वितरीत करण्याचे शासनाने आदेश दिले हाेते. मात्र, अंढेरा येथील शाखा व्यवस्थापक वडस्कर यांनी ज्या शेतकऱ्यांना रब्बीचे पिक कर्ज हवे असल्यास त्यांनी आपल्या शेतातील विहीर,तसेच शेतात विद्युत पुरवठा व कृषी पंपाचे बिल भरलेली पावती एवढाच नव्हे तर ज्या धरणावरुन शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेली आहे, त्या विभागाचा परवाना आणावा अन्यथा रब्बीचे पिक कर्ज भेटणार नाही अशी अट ठेवली हाेती. शासनाच्या नियमाप्रमाणे वरिल पैकी कुठल्याच पुराव्याची आवश्यकता नाही. इतर शाखेत ज्या शेतकऱ्यांकडे कुठल्याच प्रकारचे पिक कर्ज थकीत नाही आशा शेतकऱ्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँक इतर शाखेत रब्बी हंगामाचे पिक कर्जाचे तात्काळ वाटप करण्यात आले.मात्र, अंढेरा परिसरातील अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहीले आहेत.
बचत गटही कर्जाच्या प्रतीक्षेत
विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अंढेरासह बायगांव,सावखेड नागरे सह जवळपास महिलांचे २०ते २२बचत आहे.या बचत गटातील महिलांना पुर्वीचे बचत गटाचे कर्ज भरलेले असताना आता तुमचे रेकाँर्ड आलेली नाही.तुम्ही पंचायत समितीमध्ये संपर्क करा, संपर्क झाल्यास तुमचे रेकाँर्ड/रजिस्टर बरोबर नाही अशी कारणे देउन ताटकळत ठेवण्यात येत आहे. शासनाकडुन नवीन व्यवासाय करणाऱ्या युवकानां केंद्र शासनाकडुन मुद्रा लोन अंतर्गत पन्नास हजार रुपये कर्ज देण्यात येते. अंढेरा येथे अर्ज केलेले अनेक युवक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.