लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सायंकाळी ७ वाजेनंतर दुकाने बंद करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. परंतु शहरात बहुतांश ठिकाणी काही दुकाने त्यानंतरही रात्रीपर्यंत सुरू राहतात. त्यामुळे पालिका पथकाची गस्त ही केवळ खानापूर्तीसाठी असल्याचे दिसून येते. नियमांची ही अवहेलना कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.अत्यावश्यक सेवेसह काही प्रतिष्ठानांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठांनाना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत दुकाने, प्रतिष्ठाने आणि चहा विक्रीचीही दुकाने उघडी राहतात.जाणिवपूर्वक सुरू ठेवली जातात दुकाने!दुकाने, प्रतिष्ठाने सुरु झाली असली तरी अटी व शतीनुर्सार ती सुरू आहेत. सायंकाळी ७ वाजता सर्व दुकाने (औषधींचे वगळून) बंद करणे बंधनकारक आहे. ऐन दुकान बंद करण्याच्या वेळीच एखादा ग्राहक आला तर त्यांची तारांबळ उडते. काही जण त्याला लवकरच सामान देऊन दुकान बंद करतात. यात दुकान बंद करण्यासाठी अर्धा,पाऊण तासाचा लागणारा वेळ एखाद्या वेळी ग्राह्य समजता येईल. परंतु काही दुकानदार जाणीवपूर्वक दुकाने रात्रीपर्यंत सुरू ठेवत असल्याचे दिसून येते. हा प्रकार आतील वस्त्यांमधे अधिक दिसून येतो. पोलिसांची गाडी नियमित गस्त घालत असते. परंतु त्यांच्या नजरेत हा प्रकार कसा नाही, हा प्रश्नच आहे.
झेरॉक्स आणि स्टेशनरी दुकानेही राहतात उघडी!शहरातील काही झेरॉक्स सेंटरच्या संचालकांवर पालिका प्रशासन विशेष मेहरबान आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक दुकाने बाहेरून बंद आतून सुरू असे प्रकार सर्रास पहायला मिळतात. पोलिसांकडूनही अशा दुकानांवर कारवाई केली जात नाही.
पाणी पुरी खाणाऱ्यांची वर्दळ!पाणीपुरीचे स्टॉल सुरू ठेवण्यावर बंदी आहे. परंतु अनेक वस्त्यांमध्ये पाणी पुरीचे स्टॉल राजरोसपणे लावल्या जात आहेत.
दक्षता पथकांची गस्त नावालाच!खामगाव शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने दक्षता पथके गठीत केली आहेत. मात्र, ही पथके केवळ नावालाच आहेत.
कारवाई करणाºयांवर ‘मॅजिक’ची भुरळ !खामगाव शहरातील बालाजी प्लॉट भागातील एक चहाचे प्रसिध्द दुकान रात्री उशीरापर्यंत सुरू असते. पालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांवर ‘मॅजिक’ केली जाते. त्यामुळे या चहाच्या दुकानावर कारवाई करण्यासाठी दक्षता पथक, पोलिसांकडून सूट दिली जाते.