लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी खामगावात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी समाजापेक्षा राजकीय पक्षाला महत्व देणार्या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या निवेदनात नमूद केले की, मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन पोलीस प्रशासनाच्यावतीने चिरडण्यात आले. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. ही घटना अतिशय निदंनिय असून, अमानूषपणे करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, समाजापेक्षा राजकीय पक्षाला महत्व देणार्या राजकीय पुढार्यासह कार्यकर्त्यांचा निषेध करून त्यांचे नाव न घेता सकल मराठा समाजाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकार्यामार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष गणेश माने, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले आदी सहभागी होते.
चोख पोलीस बंदोबस्त
सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने खामगाव शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तसेच महामागार्वरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. उपविभागीय कार्यालयावर सकल मराठा समाजाच्यावतीने या घटनेचा निषेध नोंदवित. नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.