बुलडाणा : मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टीकोनातून १ आॅगस्ट रोजी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुलडाणा येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी शेकडो कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी स्थानबद्ध केले. काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात शांततेच्या मार्गाने ५८ मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही शासनाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा मराठा समाजाने निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यात आत्महत्येचे सत्र सुरु असताना जिल्ह्यात मंगळवारी दोन जणांनी आत्महत्या केली. मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील संतोष मानघाले या तरुणाने गळफास घेतला. तर मोताळा तालुक्यातील उबाळखेड येथील ४७ वर्षीय नंदू बोरसे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. बोरसे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. आरक्षणासाठी मराठा समाजातील दोन जणांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. त्यामुळे यापुढील काळात आरक्षणासंदर्भात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करीत मराठा समाजाच्या वतीने बुलडाणा येथे १ आॅगस्टला संगम चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता कार्यकर्ते एकत्र जमले. शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
जयस्तंभ चौकात बैठा सत्याग्रह
संगम चौकातून पायी चालत मराठा समाजाचे कार्यकर्ते जयस्तंभ चौकात आले. तिथे प्रमुख मान्यवरांनी आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले. एक मराठा, लाख, मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, असे कसे मिळत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. जयस्तंभ चौकात कार्यकर्त्यांनी बैठा सत्याग्रह केला. त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिस मुख्यालयातील हॉलमध्ये त्यांना स्थानबध्द करुन नंतर सोडून देण्यात आले.
तगडा पोलिस बंदोबस्त
सकल मराठा समाजाच्या जेलभरो आंदोलनादरम्यान कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणेदार यु. के. जाधव यांच्या नेतृत्वात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासून शहरातील चौकांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले होते. आंदोलन शांततेत पार पडले.